

मुंबई : महापौर, उपमहापौरपदासाठी उत्सुकता वाढली आहे. अनेक नावे चर्चेत आहेत, पण नेमका कोण गादीवर बसू शकतो, याबद्दल भाजपातच नाही तर अन्य पक्षांतही चर्चा सुरू आहे. समस्त मुंबईकरांचे याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असल्यामुळे खुल्या प्रवर्गातील महिलांसह आरक्षित प्रभागातून निवडून आलेल्या महिलाही महापौर पदासाठी उत्सुक आहेत. महापौराच्या गादीवर बसण्यासाठी भाजपाच्या काही महिला नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जाहिरातबाजीही सुरू केली आहे. यात तेजस्विनी घोसाळकर यांच्यासह शितल गंभीर, रितू तावडे, अलका केरकर, राजश्री शिरवाडकर, स्वप्ना म्हात्रे यांची नावे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. तर उपमहापौर पदासाठी यामिनी जाधव, वर्षा टेंबवलकर, संध्या दोषी, संजय घाडी यांची नावे चर्चेत आहेत.
महापौर पदाच्या गादीवर शितल गंभीर व तेजस्विनी घोसाळकरच बसतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे काही भाजपाच्या नेत्यांनी महापौर पदासाठी गेल्या अनेक वर्र्षांपासून पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या घाटकोपरच्या रितू तावडे यांचे नाव घेतले जात आहे. तसा प्रस्तावही पक्षाकडे देण्यात आल्याचे समजते. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवणाऱ्या शितल गंभीर व तेजस्विनी घोसाळकर यांना महापौरपद मिळावे, अशी काहींची अपेक्षा आहे. परंतु घोसाळकर या पक्षात नुकत्याच आल्यामुळे भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्या असलेल्या महिला नगरसेवकांना डावलणे योग्य नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबई भाजपातील वरिष्ठ नेत्यांचे मत जाणून घेऊन, अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय अंतिम
देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार सांभाळणाऱ्या मुंबई महापालिकेच्या प्रमुख पदावर आरुढ होण्यासाठी सक्षम कोण, याचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे समजते. महापौर निवड करताना, त्यांनी केलेल्या नागरीकामांसह त्यांचा महापालिकेतील अभ्यास, वक्तृत्व, महापालिका सभागृह चालवण्याची कुवत आहे का याचा सर्व विचार केला जाणार आहे. यासाठी पालिकेतील काही ज्येष्ठ नगरसेवकांचाही विचार घेतला जाणार आहे.