

मुंबई : महानगरपालिकांच्या निवडणुकीत शुक्रवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री बंडखोरांशी संवाद साधून माघार घेण्याविषयी आग्रह करीत होते. माघारीची वेळ दुपारपर्यंत असल्याने व्यस्त कार्यक्रमातही मुख्यमंत्र्यांचे ‘ऑपरेशन मनधरणी’ सुरू होते. अगदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरूनही मुख्यमंत्री फोनाफोनी करीत होते. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकत्रित ऑपरेशन राबवत भाजपच्या 121 बंडखोरांची उमेदवारी मागे घेण्यात यश मिळवले.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत शुक्रवार माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडोबांना थंड करण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरू होते. प्रत्येक जिल्ह्यात भाजपने यासाठी जबाबदारी निश्चित केली होती, त्यांना अपयश आले तर मुख्यमंत्री स्वत: चित्रात येत संबंधित बंडखोरांशी संवाद साधत होते. साताऱ्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी झाले. या सोहळ्यास मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी सारस्वतांसमोर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या मंचावर असताना मी मोबाईलवर बोलत नाही. आज मात्र तुम्ही पाहिले असेल की, मी सतत बोलत होतो. त्याबद्दल सर्वप्रथम आपली माफी मागतो. आज महापालिका निवडणुकांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सगळ्या पक्षांत इतकी बंडखोरी आहे आणि सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म मागे घेत नाहीत. त्यामुळे फॉर्म मागे घेण्यासाठी बोलत होतो. मनधरणी सुरू होती, असे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.