

सातारा : 2014 साली मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर राज्यातील पोलिसांना उत्तम व सुसज्ज निवास सुविधा मिळाव्यात, असा संकल्प केला होता. त्यानुसार पोलिस हाऊसिंग कॉर्पोरेशनला प्राधिकृत करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. आज प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस निवासस्थानांची निर्मिती सुरू करण्यात आली असून पोलिसांना घरे दिल्याचा आनंद वाटत आहे. दरम्यान, पोलिसांना आणखी सुविधा देणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
सातारा पोलिस दलाची वृंदावन पोलिस टाउनशिप व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, आ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, आ. शशिकांत शिंदे, पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जुन्या पोलिस लाईन्समध्ये पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आजच्या काळात त्या सुविधा अपुऱ्या ठरत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांना सुरक्षित, सन्मानपूर्वक व सुखद जीवन जगता यावे, या उद्देशाने नव्या व आधुनिक इमारती उभारण्याचा आपला संकल्प होता. दहा वर्षापूर्वीचा हा संकल्प पूर्णत्वास येत चालला आहे. नवीन घरांच्या चाव्या मिळाल्यानंतर पोलिसांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधानकारक सुखावणारा आहे. यापुढेही अशा सुविधा देण्याचा संकल्प सरकारने कायम ठेवला आहे. या नव्या इमारतींमुळे पोलिसांच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सुरुवातीला मुख्यमंत्री यांनी पोलिस वसाहतीची पाहणी केली. यानंतर कार्यक्रमावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पोलिस वसाहतीमधील पोलिस त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे यांच्यात गप्पा...
कोरेगावमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धी आ.महेश शिंदे व आ. शशिकांत शिंदे पोलिस वसाहतीच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले. दोघे एकमेकांच्या जवळ आल्यानंतर एकमेकांनी स्मित हास्य देवून गप्पा देखील मारल्या. हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र आल्यानंतर सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे गेल्या होत्या.