

नागपूर : राज्यातील शेतकर्यांना आतापर्यंत आपण 2017 आणि 2020 अशी दोनदा कर्जमाफी दिली. तरीही शेतकर्यांकडून कर्जमाफीची मागणी होत आहे. याचा अर्थ नियोजनात त्रुटी आहेत. त्यामुळे कर्जमाफीची योजना काय असेल, याबाबत आपण 1 जुलै 2026 पर्यंत घोषणा करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. सोबतच, मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ यासह सरकारची कोणतीही योजना बंद होणार नाही, संपूर्ण पाच वर्षे या योजना सुरूच राहतील, अशी स्पष्ट ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार कटिबद्ध आहे. सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र 2035 च्या अमृतमहोत्सवी वर्षाकडे वेगाने वाटचाल करेल. महाराष्ट्राच्या विकासाची गाडी थांबणार नाही, असा द़ृढविश्वास मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनप्रसंगी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. 2035 चा अमृतमहोत्सवी महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला वाटचाल करायची आहे. फडणवीस म्हणाले, ‘अब आगे बढ़ चुका हूँ मै, पिना था जितना जहर, पी चुका हूँ मै. अब पग नहीं रुकने वाले, चल चुका हूँ मै. जितना पढना था तुमको, पढ चुका हूँ मै. अब और आगे बढ चुका हूँ मै.’ 2029-30 च्या दरम्यान देशातील पहिली एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्र असेल, याद़ृष्टीने काम सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले.
राज्यावरील कर्ज मर्यादेतच
राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मी असे म्हणणार नाही की, आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत; पण मी एक निश्चितपणे सांगू शकतो की, देशातील मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला, तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. 2025-26 चा महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अंदाज आणि आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला, तर एकूण स्थूल उत्पन्नाच्या 18.87 टक्के इतके कर्ज आहे. 25 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा आपण खूप दूर आहोत. देशात केवळ तीन राज्ये आहेत, ज्यांचे दायित्व 20 टक्क्यांच्या खाली आहे. त्यात गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.
‘त्या’ आमदाराला खडसावले
मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान ‘विदर्भाच्या विकासाबाबत बोला,’ अशी शेरेबाजी ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली. बसल्या जागी केलेल्या त्यांच्या या विधानाने काही क्षण सभागृहात गोंधळ झाला. मात्र, मुख्यमंत्री बोलत असताना, सभागृहाचे नेते बोलत असताना मध्ये बोलायचे नसते. तुम्ही नवीन आहात, पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलात, त्यामुळे तुम्हाला सभागृहाची शिस्तही माहीत नाही आणि इथल्या मर्यादाही. मी जर तुमच्या महाविकास आघाडी सरकारने काय केले आणि आम्ही काय केले, याची तुलना इथे सांगितली, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा दमच मुख्यमंत्र्यांनी भरला.
सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात
महाराष्ट्र गुंतवणुकीत खूप पुढे चाललेला आहे. तुम्ही केलेल्या सामंजस्य करारांचे काय होते, असे अनेकजण विचारतात. दोवोसमध्ये मागच्या वर्षी 15 लाख 72 हजार 654 कोटींची गुंतवणूक केली. त्यापैकी 5 लाख 89 हजार 631 कोटी गुंतवणूक ही विदर्भात झाली. 42 हजार 810 कोटी मराठवाड्यात आणि 3 लाख 58 हजार कोटी पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात 2 लाख 23 हजार 632 कोटी गुंतवणूक झाली. थेट परकीय गुंतवणुकीचा विचार केल्यास त्यातही महाराष्ट्र नंबर 1 आहे. 2024-25 मध्ये विक्रमी 1 लाख 64 हजार 775 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली. हे प्रमाण देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 31 टक्के आहे, असे ते म्हणाले.
3 वर्षांत 1 लाख 20 हजार सरकारी नोकर्या दिल्या
महाराष्ट्रात महायुती सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाभरती अभियान सुरू केले होते. त्याअंतर्गत 3 वर्षांत 1 लाख 20 हजार सरकारी नोकर्या दिल्या. पुढच्या दोन वर्षांत तितक्याच नोकर्या देण्याचा संकल्प केला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई-कल्याण-लातूर-हैदराबाद असा ‘जनकल्याण मार्ग’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केली. या मार्गामुळे लातूर ते मुंबई अंतर साडेचार तासांवर येणार आहे, तर मुंबई ते हैदराबात अंतर 8 तासांत गाठता येईल. या महामार्गाच्या हद्दीत येणार्या सगळ्या जिल्ह्यांना वाढवण बंदर आणि नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच
आपला महाराष्ट्र हे शक्तिशाली राज्य आहे. कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही. 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल वगैरे कुणीही शंका मनात बाळगू नये. निवडणुका आल्या की, अशी टीका केली जाते. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील. आपले दैवत म्हणजे छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखवला त्या संविधानाच्या मार्गाने आपण वाटचाल करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘सीबीएसई’च्या पुस्तकात शिवरायांचा इतिहास
‘सीबीएसई’च्या पुस्तकात याआधी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासावर एक परिच्छेद होता, तर मुघलांचा इतिहास 17 पानांचा होता. आता नवीन पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा इतिहास 21 पानांचा घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभार, असे मुख्यमंत्री म्हणाले.