

Siddhivinayak Temple Donation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या पाच वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार आहे. शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर आता मंदिराच्या ट्रस्टच्या आर्थिक नोंदींची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या चौकशीचा तातडीने अहवाल देण्याची सूचना केली आहे. २०२३ ते २०२६ दरम्यान, देणगीच्या संकलतानात चढ उतार झाले होते. त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी बुधवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याआधी सदा सरवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली. सदा सरवणकर यांच्याकडून कथित अनियमिततेबद्दल ट्रस्टच्या आधीच्या ठाकरे गटाच्या सदस्यांवर आरोप करण्यात आले आहेत.
आता सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये अनियमितता, चोरी किंवा प्रशासकीय त्रुटी होत्या का याचा शोध घेतला जाणार आहे. पाच वर्षातील देणग्या आणि मौल्यवान वस्तूंचे देखील ऑडिट करण्यात येणार आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य सचिवांना अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.