

मुंबई: श्री सिद्धिविनायक मंदिरातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन, सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण यासह सुशोभिकारणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांचे सोमवारी भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवे रूप मिळणार असून भाविकांना वेगळी आध्यात्मिक अनुभूतीचा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरण पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजनानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, तसेच मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह न्यासाचे विश्वस्त उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सिद्धिविनायक मंदिरात देश विदेशातून भाविक येत असतात.
भाविकांना सुलभ व कमी वेळामध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन झाले पाहिजे. मंदिर परिसरात पायाभूत सुविधांची कामे करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मंदिर परिसराचे सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवे रूप मिळणार आहे.
दररोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा आणि प्रसन्न वातावरण मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सिद्धिविनायक मंदिर परिसरातील कॉरिडॉरच्या कामात वेगवेगळ्या व्यवस्था तयार होतील.
सुंदर प्रवेशद्वार, गर्दीचे नियोजन यासोबतच अनेक सुंदर संकल्पना यात आहेत. या कॉरिडॉरचे काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वासही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला. तर, मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या 78 कोटींच्या सुशोभिकरणाचे आज भूमिपूजन झाले. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मंदिर सुरक्षा, गर्दीचे नियोजन, सुशोभीकरण यासाठी 500 कोटी मंजूर केले. पहिल्या टप्प्याच्या कामाची पूर्तता लवकरच होईल. त्यानंतर पुढील कामांचा प्रस्ताव द्यावा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.