

नवी मुंबई: सिडकोतर्फे डिसेंबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेची ऑनलाईन संगणकीय सोडत दिनांक २० जुलै रोजी काढण्यात येणार आहे. या गृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये १६,८७६ सदनिका (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) – ८,७९५ व अल्प उत्पन्न गट (एलआयजी) – ८,०८१) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी एकूण १९,५४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. २६५० / २०२६ मध्ये २५ मार्च २०२६ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशाच्या अनुषंगाने, सदर संगणकीय सोडत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांसाठी घेण्यात येणार आहे.
या प्रवर्गासाठी एकूण १०,८३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. ही सोडत पूर्णपणे पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने घेण्यात येईल. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांची यादी सिडकोच्या अधिकृत गृहनिर्माण संकेतस्थळावर www.cidcohomes.com येथे प्रसिद्ध करण्यात येईल.
यशस्वी अर्जदारांच्या यादीत नाव समाविष्ट झाल्याने संबंधित अर्जदारास त्या सदनिकेवर कोणताही कायदेशीर हक्क अथवा दावा आपोआप प्राप्त होणार नाही. सदनिकेचे अंतिम वाटप हे अर्जदाराची पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी, गृहनिर्माण योजनेतील अटी व शर्तींची पूर्तता तसेच सिडकोच्या लागू असलेल्या इतर निकषांच्या अधीन राहील.
लॉटरीचा निकाल तसेच पुढील वाटप प्रक्रियेबाबतची अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी अर्जदारांनी www.cidcohomes.com या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.