

नवी मुंबई : राज्यात पावसामुळे यंदा तब्बल सत्तर टक्के द्राक्षाचे उत्पादन घटले आहे. यामुळे परदेशातील द्राक्षाला वाढती मागणी आहे. सध्या चीनमधून दररोज द्राक्षांच्या दोन हजार पेट्यांची आवक मुंबई एपीएमसीत होत आहे. त्यामध्ये मस्कत, सफायर, रेड ग्लोब, क्रिमसन जातीच्या द्राक्षांचा समावेश आहे.तर जानेवारी अखेर महाराष्ट्रातील आणि जून, जुलै महिन्यात कॅलिफोर्निया आणि दक्षिण आफ्रिकेतील द्राक्षांची आवक होणार असल्याची माहिती घाऊक फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.
महाराष्ट्रात झालेल्या बेसुमार पावसाने यंदा द्राक्ष पिकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पावसामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक जिल्ह्यात 70 टक्के द्राक्ष उत्पादन घटले. त्यामध्ये पुणे आणि नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. नाशिकसह बागलाणमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजेच कांद्याच्या बरोबरीने द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये उगाव, निफाड, सटाणा, पिंपळगाव, चांदवड, येवला, समिट या भागाचा समावेश आहे.
डिसेंबरपासून नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील द्राक्षांची आवक मुंबई एपीएमसीत सुरु होते. मात्र यंदा झालेल्या पावसाने उत्पादन घटल्याने आवकवर त्यांचा परिणाम झाला. यावेळी चीनमधील द्राक्षांची महिन्यापासून एपीएमसीत आवक सुरू झाली. गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात आवक सुरु असून दररोज दोन हजार पेट्या चिनी द्राक्षांच्या येऊ लागल्या आहेत. त्यामध्ये मस्कत, सफायर, रेड ग्लोब, क्रिमसन जातीच्या द्राक्षांचा आवकमध्ये समावेश आहे.
200 ते 300 रुपये किलो दराने हे द्राक्ष एपीएमसीत विक्री होतात. सात महिने चिनी द्राक्षांचा हंगाम असतो. तो जूनपर्यंत चालतेो. जानेवारीअखेर महाराष्ट्रातील आणि जून, जुलै महिन्यात कॅलिफोर्निया आणि दक्षिण आफ्रिकेतील द्राक्षांची आवक होणार असल्याची माहिती घाऊक फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.