

नागोठणे ः मुंबई -गोवा महामार्गावरील तसेच वाकण-पाली -खोपोली मार्गाकडे येण्या -जाण्यासाठी महत्वाचा नाका म्हणून वाकण नाक्याची ओळख असून वाकण नाक्यावर अनेक हॉटेल्स आहेत. त्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावरून तसेच वाकण - पाली - खोपोलीकडे येणाऱ्या -जाणा-या गाड्या चहा - नाष्टा करण्यासाठी नाक्यावरील हॉटेलच्या समोर बिनधास्तपणे उभ्या करतात. परिणामी त्याचा त्रास स्थानिक वाहनचालकांसह पादचाऱ्यांना होत आहे.
वाकण नाक्यावर वाहतुकीच्या दृष्टीने गजबजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या मार्गावरील वाहनांची संख्या पाहता वाकण नाका हा वाहतुकीच्या दृष्टीने पार्कीगसाठी अपुरा ठरत आहे.त्याच्यातच या नाक्यावरुन मोठ्या प्रमाणात प्रमाणापेक्षा जास्त भरलेल्या डंपरमधुन कोळशाची देखील वाहतुक होत आहे. ही वाहतुक दिवसभर सुरू असते.
दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला हॉटेल्स असल्यामुळे या ठिकाणी थांबणा-या वाहनांमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत असुन अनेक वेळा अपघात सुद्धा घडत आहेत. अनेकदा तर वाहनचालकांमध्ये शुल्लक कारणांवरुन वाद होण्याच्या घटना घडत आहेत.
वाहतुकोंडीवरती नियंत्रण करण्यासाठी वाकण नाक्यावर पोलिस चौकी कार्यरत आहे. पंरतु पोलिस असुनही वाहतुक नियमांचे उल्लंघन करीत वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावलेली पहावयास मिळतात. पंरतु नियम पायदळी तुडविणा-या वाहनचालकांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्षे अखेर असल्याने पर्यटकांच्या वाहनांची संख्या पुढील काही दिवस वाढणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस यंत्रणा काही उपाययोजना आखणार की नाही असा प्रश्न स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.