Mumbai BMC Child Labour |
मुंबई : मुंबईतील मान्सूनपुर्व नालेसफाईची कामे सुरु आहेत. मात्र, या नालेसफाईच्या या कामाला काही ठिकाणी अल्पवयीन मुलांना जुंपल्याचे निदर्शनास आले आहे. अंधेरीतील पालिकेच्या के. ईस्ट विभागातील चर्च रोड परिसरातील नाले सफाईत बालकामगार नाले सफाई करताना दिसून आला, तसेच या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणत्याही संरक्षक उपकरणांशिवाय नाल्यातील घाण साफ करण्यासाठी उतरवले जात असल्याचेही दिसून आले. या दरम्यान बालकामगार कायद्याला कंत्राटदारांकडून केराची टोपली दाखविण्यात आली. यामुळे आता मुंबई महापालिका प्रशासन काय कारवाई करते, याकडे बाल कामगार विभागाचे लक्ष लागून राहिले आहे.
अंधेरी पुर्वकडील मरोळ येथील चर्च रोड परिसरात पालिकेच्या कंत्राटी कामगारांना हातमोजे, बूट, मास्क किंवा सुरक्षा गणवेश यांसारख्या कोणत्याही संरक्षक उपकरणाशिवाय उघड्या नाल्यात सफाईचे काम करावे लागत आहे. तसेच या कामगारांमध्ये बालमजूरांचाही समावेश आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा पालिकेच्या कंत्राटदाराकडून बालमजूर कायद्याचे उल्लंघन होत आहे. तसेच २००६ साली मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला सर्व संरक्षक कामगारांना, विशेषत: नाल्यांमध्ये काम करणाऱ्यांना पुरेशी सुरक्षा उपकरणे पुरवण्याचे निर्देश दिले होते. पुढे २०११ सालीही सर्वोच्च न्यायालयाने या निर्देशांचा पुनरुच्चार केला होता.
त्यानंतर २०१३ साली रोजगार प्रतिबंध आणि त्यांचे पुनर्वसन कायदा पारित करण्यात आला, ज्यामुळे अशा असुरक्षित प्रथांना बेकायदेशीर ठरवण्यात आले. तरीही राष्ट्रीय सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोगाने २०१८ साली सांगितले कि, नालेसफाईच्या कामात दर पाच दिवसांनी एका व्यक्तीचा मृत्यू होतो. अशी गंभीर बाब समोर असताना पालिकेकडून स्वच्छता कामगारांच्या सुरक्षिततेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच, पालिकेच्या वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी करून संबधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.