CM Fadnavis | आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला : मुख्यमंत्री
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अन्वयार्थ लावला. यंत्रणेच्या चुकांमुळे राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या काही निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलल्या गेल्या. या सर्व प्रक्रियेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आयोगाने या सगळ्या प्रक्रियेत सुधारणा केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर सोमवारीच मुख्यमंत्र्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. गेली 25-30 वर्षे मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. एकदा घोषित झालेल्या निवडणुका आणि निकाल पुढे जात असल्याचे पहिल्यांदा घडत आहे. मला ही सगळी पद्धत योग्य वाटत नाही.
खंडपीठ आणि निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यांचा निकाल मान्य करावा लागेल. मात्र यातून निवडणूक लढविणारे, त्यासाठी मेहनत करणाऱ्या उमेदवारांचा भ्रमनिरास होतो. यंत्रणेच्या चुकांमुळे अशा गोष्टी होता कामा नये. आयोगाला यापुढेही अनेक निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यामुळे आयोगाने या सगळ्या प्रक्रियेत सुधारणा केली पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असे होणार नाही हे पाहिले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेचे पालन झाले, अशा ठिकाणी कोणीतरी एकजण न्यायालयात गेला, त्याला न्यायालयाने दिलासा दिला नाही. मात्र, तो न्यायालयात गेला म्हणून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत कायद्याच्या आधारावर आणि प्रक्रियेवर नाराजी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

