

मुंबई : पंधरा वर्षांच्या बहिणीचे 32 वर्षांच्या दिरासोबत बळजबरीने लग्न लावून दिले होते. अत्याचार सहन न झाल्याने अखेर सहा महिन्यांनंतर त्या अल्पवयीन पीडितेने दोन दिवसांपूर्वी मालाड पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पतीसह तिची बहीण, तिचा पती आणि आजीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पतीला मालाड पोलिसांनी अटक केली आहे.
15 वर्षांची ही मुलगी मालाड परिसरात राहते. अटक आरोपी पीडितेच्या बहिणीचा दीर असून तो व्यवसायाने पेंटर आहे. गेल्या वर्षी पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असताना तिच्या बहिणीने दिरासोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर जुलै 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत त्याने तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने अनेकदा लैंगिक अत्याचार केला होता. त्याच्याकडून तिचे सतत मानसिक व शारीरिक शोषण सुरू होते. या शोषणाला कंटाळून तिने तिच्या कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.
या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत 32 वर्षांच्या आरोपी पती असलेल्या पेंटरला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. इतर तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.