

नालासोपारा ः वसईतील दामुपाडा परिसरात घडलेल्या थरारक दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा 48 तासांत लावण्यात पोलिसांना यश आले असून मित्राची संपत्ती पाहून मित्रानेच हा दरोडा घातल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे.
या प्रकरणी तीन आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखा- कक्ष 2, वसई यांनी गजाआड केले असून तब्बल 10 लाखांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी फिर्यादी गीता राऊत यांच्या घरात तिघांनी जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी व त्यांचा मुलगा यांना धरून त्यांच्या गळ्यावर चाकू लावून सोन्याबद्दल चौकशी केली. फिर्यादी यांनी नकार दिल्यानंतर आरोपींपैकी एकाने त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वार चुकला तरी त्यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर आरोपींनी कपाटातील 12 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल असा ऐवज घेऊन पसार झाले. या घटनेनंतर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी यांचा नवरा चित्रसेन राऊत यांचा मित्र काळू प्रभाकर साहू हा त्यांच्या घरी येत जात असे त्याने चित्रसेनची संपत्ती पाहून त्याची नियत फिरली त्याने मित्राच्या घरी दरोडा घालण्याचा प्लान आखला. साहू याने अशोक उर्फ बाबू राजू शिंदे या गुन्हेगाराला हाताशी धरून बिगारीचे काम करणारे कामगार यांना पैशाचा आमिष दाखवून नुर हसन खान, सुरज किशोर जाधव यांनी मिळून घराची रेकी केली. प्लान आखल्यानंतर काळू याने दरोडा घालताना घराच्या आसपास कुठेच न फिरता आरोपी दरोडा घालून पळाल्यानंतर फिर्यादीच्या घरी आला आणि तिच्यासोबत तक्रार देण्यासाठी वाली पोलीस ठाण्यात त्यांचं सांत्वन करण्याचा खोटं नाटक करून पोलीस काय करतात याचा मागोवा घेत राहिला.