

मुंबई: राजस्थानमधील तरुणांचा राजकीय वापर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न जनतेने हाणून पाडला असून, ‘वंदे मातरम्’ पूर्ण म्हणणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे, अशी टीका भाजपा राजस्थान महापालिका प्रभारी व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
राजस्थानमध्ये ३१८ नगरपालिका, नगरपरिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी जवळपास २३९ नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचे बोर्ड स्थापन होणार आहेत.
दहा महानगरपालिकांचा विचार केला तर आठ महानगरपालिकांमध्ये भाजपचे महापौर होणार आहेत. केवळ बिकानेर आणि अजमेर या दोन ठिकाणी भाजप थोड्या बहुमताने मागे राहिला आहे. त्यामुळे हा राजस्थानच्या जनतेचा मोठा विजय आहे.
कल्याणमधील आयकॉनिक पद्मिनी प्रकरणातील जमीनवाटपाबाबत चौकशी सुरू आहे. प्रीमियर कंपनीच्या जमिनीशी संबंधित प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल आमच्यासमोर येईल. अहवाल आल्यानंतर नाना पटोले यांनी विधानमंडळात जे मुद्दे मांडले होते, त्याचे स्पष्टीकरण विधानमंडळातच करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.