

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. निम्म्या मुंबईकरांची तहान भागवणारा ठाणे जिल्ह्यातील भातसा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीटंचाईची संकट लवकरच टळणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वाधिक मोठा तलाव असलेला भातसाही १०० टक्के भरल्यामुळे जल अभियंता विभागाने समाधान व्यक्त केले आहे. या तलावामध्ये ७ लाख १७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.
या तलावातून शहराला दररोज १८५० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीपुरवठा होतो. दरम्यान सर्व तलावातील पाणीसाठा ९८ टक्केवर पोहचला असून तलावातील वाढलेल्या पाणीसाठ्यासह पावसाचा आढावा घेऊन, पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घ्यायचा की नाही, हे लवकरच ठरवण्यात येणार आहे.