

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी आठ मेल/एक्सप्रेस गाड्यांमधील सध्याच्या पारंपारिक डब्यांच्या जागी नवीन एलएचबी डबे कायमस्वरूपी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एक्सप्रेस, पुणे - वेरावल एक्सप्रेस, पुणे - भगत की कोठी एक्सप्रेस, पुणे - भुज एक्सप्रेस, पुणे - अहमदाबाद एक्सप्रेस, कोल्हापूर - नागपूर एक्सप्रेस, कोल्हापूर - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस, आदी गाड्यांचा समावेश आहे. 14 जानेवारीपासून हे डबे जोडण्यास सुरूवात होणार आहे.
एलएचबी डबा हा आधुनिक, स्टेनलेस स्टीलपासून बनवलेला प्रवासी रेल्वेडबा आहे. जो जर्मनीमध्ये डिझाइन करण्यात आला असून भारतात तयार केला जातो. या डब्यांमध्ये अँटी-क्लाइंबिंग उपकरणे आणि अग्निरोधक साहित्य यांसारख्या अत्याधुनिक सुरक्षा सुविधा दिलेल्या आहेत. जुन्या पद्धतीच्या डब्यांच्या (140 किमी प्रतितास) तुलनेत या डब्यांचा कार्यरत वेग 160 किमी प्रतितास इतका आहे. रचना वेग 200 किमी प्रतितासपर्यंत आहे.
डब्यांमध्ये अधिक जागेसाठी लांब बॉडी, प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आसनव्यवस्था, एलईडी प्रकाश व्यवस्था, चार्जिंग सॉकेट्स आणि कार्यक्षम ब्रेकिंगसाठी डिस्क ब्रेक्स यांचा समावेश आहे. तसेच, यात जलद बचावासाठी चार आपत्कालीन उघडता येणाऱ्या खिडक्या आणि 6 तास बॅकअप असलेले आपत्कालीन प्रकाश युनिट उपलब्ध आहे.
शताब्दीला 25 वर्षापूर्वी एलएचबी डब्यांची आयात
पहिले एलएचबी डबे 2000 साली शताब्दी एक्सप्रेससाठी जर्मनीहून आयात करण्यात आले. भारतातील पहिला एलएचबी डबे तयार करणारा कारखाना 2001 साली स्थापन करण्यात आला. सध्या एलएचबी डबे रेल कोच फॅक्टरी (कपूरथला), इंटिग्रल कोच फॅक्टरी (चेन्नई) आणि मॉडर्न कोच फॅक्टरी (रायबरेली) येथे तयार केले जात आहेत.