

Central Railway Megablock 19 October 2025
मुंबई : दिवाळीच्या आठवड्यात मेगाब्लॉक रद्द होईल अशी प्रवाशांची अपेक्षा होती, मात्र, मध्य रेल्वेने रविवारी साडेपाच तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. ऐन दिवाळीत रेल्वे प्रवाशांना वेठीस धरल्याने संताप व्यक्त होत आहे.
विद्याविहार आणि ठाणे स्थानकांच्या दरम्यान मुख्य मार्गावरील उपनगरीय सेक्शन्सवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 08.00 ते दुपारी 13.30 पर्यंत तब्बल साडेपाच तास ब्लॉक असेल. त्याचा परिणाम जलद वाहतुकीवर होणार असून मुंबईकरांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेने मात्र ब्लॉक घेतला नाही.
अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन
मेगाब्लॉकमुळे अप मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि विद्याविहार स्थानकावर पुन्हा वळवल्या जातील. त्या 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्गावर पाच तासांचा ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चुनाभट्टी/बांद्रा डाउन हार्बर मार्गवर 11.40 ते 16.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/ बांद्रा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गवर 11.10 ते 16.10 पर्यंत ब्लॉक राहील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गवर आणि वेस्टर्न रेल्वे मार्गवर प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 10.48 ते 4.43 पर्यंत बांद्रे /गोरेगावला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.