

जोगेश्वरी : बांधकाम प्रकल्पस्थळी निष्काळजीपणामुळे जोगेश्वरीत नाहक बळींचे सत्र सुरूच आहे. गांधीनगर येथे एका निर्माणधीन इमारतीवरून सिमेंट ब्लॉक डोक्यात पडून संस्कृती अनिल अमिन (वय 22) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. यापूर्वी मार्चमध्येही आशाच एका घटनेत मायलेकींची बळी गेला आहे.
संस्कृती ही कुटुंबातील एकलती एक मुलगी असून पाच दिवसांपूर्वीच एका बँकेत नोकरीला लागली होती. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. येथील गांधीनगरातील धोबी घाटाजवळ श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता नेहमीप्रमाणे रस्त्यावरून संस्कृती कामाला जात असताना एक मोठा सिमेंट ब्लॉक तिच्या डोक्यावर पडला. यात ती रक्तबंबाळ होत बेशुद्ध झाली. तिला महापालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केल. मात्र त्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती.
मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये संस्कृतीचे वडील अनिल अमिन यांनी तक्रार दिली असून श्रद्धा कन्स्ट्रक्शनचे विकासक, कॉन्ट्रॅक्टर, सुपरवायझर, इंजिनिअर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मेघवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरू आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनागसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पालिका अधिकार्यांचेही दुर्लक्ष
संबंधित प्रकल्पाला महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने परवानगी देताना काही अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या. मात्र, संबंधित विकासकाने याचे पालन केले नाही याकडे पालिका प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अपघाताला पालिकेचे संबंधित अधिकारी सुद्धा जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे.
सुरक्षा जाळी असती तर...
इमारतीचे बांधकाम सुरू असताना या ठिकाणी सुरक्षा विषयक (सुरक्षा जाळी) कोणत्याच उपायोजना करण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे. इमारतीच्या लगत मुख्य रस्ता असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे. जर सुरक्षा जाळी असती तर संस्कृतीचा जीव वाचला असता. यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
5 दिवसांपूर्वीच लागली नोकरीला
संस्कृती ही बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या जवळच आपल्या कुटुंबासोबत वास्तव्याला होती. नुकताच तिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला होता. पाच दिवसांपासून ती आरबीएल बँक, गोरेगाव पश्चिम याठिकाणी कामाला जात होती.
जोगेश्वरीतील यापूर्वीच्या दुर्घटना
15 मार्च 2024 - दुर्गानगर येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना लोखंडी रॉड हातावर पडून युवक गंभीर जखमी.
11 मार्च 2023 - मलकानी डेव्हलपर्स या विकासकाचे इमारतीचे बांधकाम सुरू असताना लोखंडी रॉड रस्त्यावरून जाणार्या मायलेकींवर कोसळून जागीच मृत्यू.
16 जून 2025 - देवभूमी कन्स्ट्रक्शनचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीलगतच्या रस्त्याने जाणार्या तीन महिलांच्या अंगावर स्लॅब कोसळून महिला जखमी.
6 ऑक्टोबर 2025 - मध्यरात्री इमारतीचे काम सुरू असताना तीन कामगार पडून एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी जखमी.