

मुंबई : कामाच्या पहिल्याच दिवशी एका अज्ञात महिलेने वयोवृद्ध महिलेच्या घरातील लॉकरमधून चार लाख रुपयांची रोकड घेऊन पलायन केल्याची वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. या महिलेविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरू केला आहे.
72 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या मुलासोबत वांद्रे येथे रहाते. तिला घरकामासाठी मोलकरणीची गरज होती. स्थानिक रहिवाशांना मोलकरणीविषयी सांगितल्यानंतर शुक्रवारी सकाळी दहा वाजता तिच्या घरी एक महिला आली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर तिने उद्यापासून कामावर येण्याचे मान्य केले. दुसर्या दिवशी सकाळी नऊ वाजता ती कामावर आली.
दुपारी अडीच वाजता या महिलेने कपडे आणले नाहीत, कपडे घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेली. नंतर ती परत आलीच नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने कपाटातील लॉकरची पाहणी केली असता लॉकरमधील चार लाखांची कॅश चोरीस गेल्याचे तिच्या निदर्शनास आले. कामासाठी आलेल्या या अज्ञात महिलेने कामाच्या पहिल्याच दिवशी लॉकरमधील कॅश घेऊन पलायन केले होते.
वयोवृद्ध महिलेने घडलेला प्रकार वांद्रे पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या मोलकरीण महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन तिची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.