कविवर्य नारायण सुर्वेंच्‍या घरात चोरी, चोरट्याला झाली उपरती..!

चाेरलेल्‍या वस्‍तू पुन्‍हा घरात आणून ठेवल्‍या, चिठ्ठीतून मागितली माफी
चोरट्याला जेव्‍हा समजलं की, आपण कविवर्य नारायण सुर्वे यांच्‍या घरीत चोरी केली तेव्‍हा त्‍याला उपरती झाली आणि त्‍याने सर्व वस्‍तू परत केल्‍या.
चोरट्याला जेव्‍हा समजलं की, आपण कविवर्य नारायण सुर्वे यांच्‍या घरीत चोरी केली तेव्‍हा त्‍याला उपरती झाली आणि त्‍याने सर्व वस्‍तू परत केल्‍या.

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली...कविवर्य नारायण सुर्वे यांच्‍या कवितेमधील या ओळी आजही कष्‍टकरी, सर्वसामान्‍याचं जगणं मांडतात. सुर्वेंनी आयुष्‍यभर कष्‍टकरी, शोषित, वंचितांच्‍या जगण्‍यातील दाहकता आपल्‍या शब्‍दांतून मांडली. याच शब्‍दांची दाहकता एका चोरट्यालाही जाणवली..! हे सांगण्‍याचं कारणं म्‍हणजे एका चोरट्याला जेव्‍हा समजलं की, आपण कविवर्य नारायण सुर्वे यांच्‍या घरीत चोरी केली तेव्‍हा त्‍याला उपरती झाली आणि त्‍याने चाेरी केलेल्‍या सर्व वस्‍तू परत केल्‍या....!

कविवर्य नारायण सुर्वे यांचे साहित्यक्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातीय योगदान माहिती नसणारा व्यक्ती विरळाच असेल. याची प्रचिती देणारा हा प्रसंग. सुर्वे यांच्या नेरळमधील घरात एका चोराने हातसाफ केला, हा चोर त्यांच्या घरी चोरीसाठी परत आला असता त्याच्या लक्षात आले की, हे घर कविवर्य नारायण सुर्वे यांचे आहे. आपण केलेल्या कृतीचा पश्चाताप होऊन या चोराने चोरलेल्या सर्व वस्तू घरी परत ठेऊन दिल्या आणि माफी मागणारी एक चिट्टीही मागे ठेवली.

सुर्वे यांनी त्यांच्या कवितांतून कामागार आणि शोषित घटकाला आवाज दिला. सुर्वे यांचे निधन २०१०ला झाले. सुर्वे यांचे घर रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे आहे. या घरी त्यांच्या कन्या सुजाता आणि त्यांचे पती गणेश घारे राहतात. हे कुटुंबीय काही कारणानिमित्त विरारा येथे गेले होते, आणि घर १० दिवस बंद होते.

सुर्वेंचा फोटो पाहून चोरट्याला झाला पश्चाताप

घर बंद असल्यांचे संधी साधत एक चोराने सुर्वेंच्‍या घरी प्रवेश केला. घरातील एलईडी टीव्ही आणि अन्‍य वस्तूवर त्‍याने डल्‍ला मारुन पळ काढला. दुसर्‍या दिवशी अजून काही वस्तू मिळतात का हे पाहण्‍यासाठी हा चोरटा पुन्हा घरी घुसला; पण यावेळी त्याला सुर्वे यांचा एक फोटो आणि त्यांच्या आठवणी सांगणाऱ्या इतर काही वस्तू एका खोलीत दिसल्या.आपण चोरी करत असलेले घर कविवर्य नारायण सुर्वे यांचे आहे, याची कल्पना येताच चोराला पश्चाताप झाला. त्याने चोरलेल्या सर्व वस्तू घरात परत ठेवल्या. सोबत त्याने माफी मागणारी एक चिट्टीही घरी ठेवली.

सुजाता आणि गणेश घारे घरी परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिस स्टेशनला याची कल्पना दिली. पोलिस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिली आहे.

अर्थात हा चोर सुशिक्षित असणार आणि त्याने सुर्वे यांच्या साहित्याचे वाचन केले असणार, हे मात्र नक्की.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news