

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पहिला विवाह झाला असतानाही त्याची वाच्यता न करता ५९ वर्षीय व्यक्तीने ५३ वर्षीय महिलेसोबत दुसरा विवाह करुन तिची फसवणूक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कांदिवलीमध्ये समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आलेनंतर पीडित विवाहितेने याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी पती बंडू कुलकर्णी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायलायात धाव घेतली आहे.
कांदिवली पुर्वेकडील ठाकुर गाव परिसरात आईसोबत रहात असलेल्या ५३ वर्षीय तक्रारदार या बॅंकेत लोन एजंट म्हणून काम करतात. आरोपी पती बंडू कुलकर्णी (५९) यांच्यासोबत येथील एका मंदिरात १९९७ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर मात्र आपल्या विवाहाची नोंदणी झाली नसल्याचे कारण पूढे करुन बंडू यांनी एकत्र रहाण्यात नकार दिला. २००६ मध्ये या दाम्पत्याच्या लग्नाची नोंदणी झाली. तेव्हापासून दोघेही येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये दोघांच्या नावावर संयुक्त घर खरेदी करुन राहत होते. घरासाठी तक्रारदार विवाहितेने आपले सर्व सोन्याचे दागिने विकून १५ लाख रुपये दिले होते. याच दरम्यान, तक्रारदार या दोन वेळा गर्भवती राहिल्या. मात्र बंडू याने गर्भपात करण्यास भाग पाडले होते.
बंडू हे वारंवार गावी जाण्यासाठी हट्ट करत असल्याने तक्रारदार यांना संशय आला. त्यांनी बंडू यांची माहिती काढली असता त्यांचा आधीच एक विवाह झाला असून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन आपत्ये असल्याची धक्कादायक माहिती तक्रादार यांना समजली. बंडू यांनी आपला विवाह झाला असल्याचे लपवून ठेवत आपल्याशी दुसरे लग्न केल्याचे समजताच तक्रारदार यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांनी बंडू यांना विचारणा केली असता त्यांनी पहिल्या लग्नाची कबुली दिली.
मात्र तुझ्यावरच आपले प्रेम असून कधीच सोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी तक्रारदार यांना दिले. फसवणूक होऊनही बंडू यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी तक्रारदार या त्यांच्यासोबत राहू लागल्या. मात्र बंडू यांनी २००९ मध्ये आपला हा विवाह रद्द होण्यासाठी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने २०१७ मध्ये बंडू याचा अर्ज निकाली काढत या दोघांचा विवाह अबाधित ठेवला.
कौटुंबिक न्यायालयात वाद पोहचला असतानाच २०११ पासून बंडू हे विभक्त राहू लागले. तरीसूद्धा घरी येऊन ते तक्रारदार विवाहितेवर लैंगिक अत्याचार करत होते. २०१४ मध्ये तक्रारदार या पून्हा गर्भवती राहिल्या. यावेळीही बंडू यांनी त्यांना गर्भपात करण्यास भाग पाडले. आणि त्यानंतर बंडू यांनी तक्रारदार यांच्याकडे येणे-जाणे बंद केले. राहत्या घराच्या कर्जाचे हफ्ते थकल्याने हे घर विक्री करुन तक्रारदार यांना माहेरच्यांचा आश्रय घ्यावा लागला. तरीही बंडू हे तक्रारदार विवाहितेला भेटण्यासाठी येऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतच होते.
कोरोना महामारीमुळे मार्च २०२० पासून लॉकडाऊन आणि अन्य निर्बंध लागू करण्यात आले आणि बंडू यांनी तक्रारदार यांना कायमचेच सोडून दिले. अखेर तक्रारदार यांनी समता नगर पोलीस ठाणे गाठून पती बंडू यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करुन याप्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.