

मुंबई : मरिनड्राईव्ह येथील एका व्यावसायिकाच्या घरातून साडेतीन कोटींच्या हिऱ्यासह सोन्याचे दागिने चोरी करुन पळून गेलेल्या अर्चना सुनिल साळवी या 44 वर्षांच्या आरोपी केअरटेकर महिलेला मरिनड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 27 लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले असून उर्वरित दागिने लवकरच हस्तगत केले जाणार आहे. अटकेनंतर तिला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले.
यातील वयोवृद्ध तक्रारदार मरिनड्राईव्ह येथे राहत असून त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. कामानिमित्त ते दुबईत राहत असून अधूनमधून त्यांच्या मरिनड्राईव्ह येथील घरी येत होते. त्यांची आई वयोवृद्ध असल्याने त्यांनी त्यांच्या घरी एका महिलेसह चौघांना घरगडी म्हणून नोकरीस ठेवले होते.
एप्रिल ते जुलै महिन्यांत त्यांच्या घरी साडेतीन कोटीची चोरी झाली होती. त्यात 1437 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे, हिऱ्यांचे दागिन्यांचा समावेश होता. हा प्रकार जुलै महिन्यांत उघडकीस येताच त्यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
याच गुन्ह्यांत घरातील चार नोकरांचा पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत मे महिन्यांत अर्चना नावाची एक महिला तक्रारदाराच्या वयोवृद्ध आईच्या देखभालीसाठी आली होती. तिला दहा दिवसांसाठी कामावर ठेवण्यात आले होते. या माहितीनंतर पोलिसांनी अर्चनाचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल, पोलीस निरीक्षक अर्पणा व्हटकर, मनिषा घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आनंद नागराळ, प्रदीप चौधरी, उपनिरीक्षक श्रीनिवास साठे, संजय पाटील, राकेश शिंदे, यास्मीन मुल्ला, पोलीस अंमलदार मधुकर बागुल, संदीप सांगळे, भारत किसे, मंगेश मलपुरे, मिलिंद मुलमुले, गोरडे, मोकांशी यांनी कल्याण येथून अर्चना साळवी हिला ताब्यात घेतले होते.
आरोपी महिला कल्याणमधील
तिच्याकडून पोलिसांनी 1249 ग्रॅम वजनाचे विविध सोने आणि हिऱ्याचे दागिने असा 1 कोटी 27 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काही दागिन्यांची तिने विक्री केली असून तिच्याकडून उर्वरित चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. अर्चना ही कल्याणच्या कोळसेवाडी, शिवसाई हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहते. चोरीच्या याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते.