

मुंबई : गेल्या नऊ वर्षांत 4 हजारांहून अधिक जागा वाढवूनही वैद्यकीय प्रवेशातील स्पर्धा कमी झालेली नाही. वाढलेल्या जागांवर प्रवेश मिळावा म्हणून दरवर्षी राज्यातील महाविद्यालयांतील चुरस पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नऊ वर्षांत राज्यातील एकही एमबीबीएसची जागा रिक्त राहिलेली नाही.
देशातील डॉक्टरांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला आहे. त्यानुसार काही वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय अभ्याक्रमांच्या जागांमध्ये वाढ करण्यात येत आहे. मागील नऊ वर्षांत राज्यात 4 हजार 44 जागा वाढल्या. मात्र तरीही दरवर्षी सर्व जागा भरल्या जातात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागत आहे.
राज्यामध्ये मागील काही वर्षांत नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याबरोबरच अनेक महाविद्यालयांत जागा वाढही करण्यात आली. यातून राज्यातील विद्यार्थ्यांचा वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे कल अधिक असल्याचे दिसून येत आहे. 2016-17 मध्ये राज्यात केवळ 4 हजार 487 एमबीबीएसच्या जागा उपलब्ध होत्या. यानंतर 2018-19 पासून जागावाढीचा वेग लक्षणीय वाढू लागला.
2018-19 मध्ये 4,599 जागा, 2019-20 मध्ये 5 हजार 785 आणि 2020-21 मध्ये जवळपास 5 हजार 900 जागा उपलब्ध झाल्या. त्यानंतरही संख्या सातत्याने वाढत 2025-26 मध्ये तब्बल 8 हजार 535 वर पोहोचली. या जागांमध्ये तब्बल 4 हजार 44 जागा वाढल्या. या नऊ वर्षांत एका वर्षाच्या अंतराने हजारच्या आसपास जागा वाढल्या. 2025-26 मध्ये जागांची संख्या ही 8 हजार 535 इतकी झाली. या जागांवर यंदा 4 हजार 495 मुलांनी तर 4 हजार 40 मुलींनी प्रवेश घेतले.
यावर्षी या जागांसाठी स्पर्धा अधिकच तीव्र होती. नीट गुणांच्या आधारे टॉप महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड पहिल्या फेरीपासून वाढलेली दिसली. पहिल्या फेरीत काही जागा रिक्त असल्या, तरी विद्यार्थ्यांचे पसंतीक्रम बदलणे, पुनर्निवडीतील हालचाल आणि मुक्त फेरीतील महाविद्यालयांचा तत्पर प्रतिसाद यांच्या जोरावर अंतिम टप्प्यात एकही जागा रिक्त राहिली नसल्याचे दिसून आले.
2025-26 मध्ये जागांची संख्या ही 8 हजार 535 इतकी झाली. या जागांवर 4 हजार 495 मुलांनी तर 4 हजार 40 मुलींनी प्रवेश घेतले.