

Uttar Marathi Movie
अनुपमा गुंडे
आजच्या ई - जमान्यात जन्माला आलेल्या पिढीची प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तंत्रज्ञानाइतके मोठे नाही, अशी धारणा होते आहे. नव्हे तर मानवी भावभावनांच्या जंजाळापेक्षा तंत्रज्ञानाच रोजच्या जगण्याचा खरा आधार आहे, असेच काहीसे मानून जगणाऱ्या भावनांच्या पातळीवर अत्यंत रूक्ष असणाऱ्या तंत्रस्नेही तरूण मुलांची आणि त्याच्याविरूध्द जगात वावरणाऱ्या एका संवेदनशील मनाच्या आईच्या नात्याची ही गोष्ट आहे.
उमा भालेराव (रेणूका शहाणे) पती महेश भालेराव यांच्या निधनानंतर एकल माता म्हणून मुलगा निनादला (अभिनय बेर्डे) लहानाचा मोठा करते. ती रेडिओवर निवेदिका आहे, तर निनाद हा महाविद्यालयात तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतो आहे. कोकणात राहणारी मोठी बहीण शांता (निर्मिती सावंत) हाच उमाचा एकमेव आधार असते.
निनादचं संगोपन करताना प्रत्येक आईची जशी अतिकाळजी, त्या काळजीपोटी होणारा प्रश्नांचा मारा तर दुसरीकडे नकळत दिनचर्येतील घडामोडीतून लावली जाणारी शिस्त. असा प्रत्येक घरात आई -मुलांमध्ये होणारा संवाद, लुटुपुटुची भांडणं आणि मतभेद हा सगळा माहोल पाहून प्रत्येक आई त्या भूमिकेत स्वतःला नकळत पहाते. पण या चित्रपटातील आई ही एकल माता. त्यातून निनाद ने तिला एका मित्रासोबत बोलतांना पहिलेला प्रसंग त्याच्या मनात कोरला जातो. उमा मात्र निनादसाठी त्या मित्रासोबत परदेशात जाण्यासाठी नकार देते.
संवेदनशील आईच्या भावना या निनादला अतिरेकी वाटत असतात, त्यामुळे तिच्या या अतिकाळजीवाहू स्वभावामुळे आणि प्रश्नार्थक स्वभावामुळे निनाद आणि उमा यांच्यात संवादाचा अभाव असतो. त्यातच निनादच्या कॉलेजमध्ये भरणाऱ्या माईंडफेस्टमध्ये व्हर्जन तयार करायचे असते. घरातल्या दिनचर्येत तंत्रज्ञानाच्या रूपात आईचेच व्हर्जन करण्याची कल्पना सुचते. आणि हे करतांना त्याचा आईशी होणारा संवाद, त्यातून त्या उलगडणारी आई आणि अचानक या छोट्या आजाराचं निमित्त होवून जगाचा निरोप घेणारी आई असा सगळा चित्रपटाचा प्रवास आहे. हा प्रवास कमी पात्रात लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी भावूक आणि काळजाला हात घालणारा केला आहे.
हुशार, संवेदनशील, उत्कृष्ट निवेदिकेबरोबरच प्रत्येकाला आपली असेल अशी आई रेणुका शहाणे यांनी उभी केली आहे. अभिनय बेर्डेनेही आजच्या पिढीतील तरूण समर्पक साकारला आहे. आईच सतत केअरिंग असण्याला, प्रश्नार्थक स्वभावाला वैतागलेला, व्यावहारिक जग आणि कामापुरते संबंध ठेवणाऱ्या नात्यांच्या अनुभवांमुळे मैत्रीण क्षिप्रा (ऋता दुर्गुळे) हिच्याशी दुरावा ठेवणारा, सर्वात महत्वाचं म्हणजे आईच्या निधनानंतरही अत्यंत रूक्षपणे त्याकडे पाहणारा कोरडा निनाद अभिनय बेर्डे यांनी अतिशय संयत आणि चपखल साकारला आहे.
बहिणीच्या छोटेखानी भूमिकेत निर्मिती सावंत आणि मैत्रिणीच्या भूमिकेत ऋता दुर्गुळे यांनीही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. एकल पालक असली तरी आईही एक बाई आणि त्याआधी ती माणूस आहे आणि जगातलं तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी आईला पर्याय असू शकत नाही. तंत्रज्ञानाने जगाचा कितीही ताबा घेतला तरी भावनांचा मालकी हक्क कायम माणसांकडे रहाणार आहे, हे सत्य आजच्या पिढीला कळण्यासाठी आणि आपल्या आईचं मोल कळण्यासाठी तंत्रज्ञानात सुख शोध शोधणाऱ्या ई पिढीतील प्रत्येक मुलाने आपला भावनांक तपासण्यासाठी पहावा असा चित्रपट आहे.