

मुंबई : रेल्वे मार्गावरून जाणारा पहिला केबल स्टेड पूल महालक्ष्मी रेल्वे स्टेशनलगत साकारत आहे. हा पूल बांधण्यासाठी 78 मीटर उंच मोठा आरसीसी खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम प्रगती पथावर असून 2026 अखेरीस या पुलावरून गाड्या धावतील, असा दावा मुंबई महापालिकेकडून केला आहे.
महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवरून जाणार्या वाहतूक पुलाची रुंदी कमी असल्यामुळे महालक्ष्मी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यात हा पूलही जुना झाल्यामुळे धोकादायक बनला होता. त्यामुळे हा फुल तोडून नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. केबल स्टेड पूल’ हा रेल्वे मार्गावरील पहिला केबल आधारित पूल आहे. हा पूल सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना जोडतो. या पुलाची लांबी 803 मीटर तर रुंदी 17.2 मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी 23.01 मीटर इतकी आहे. तसेच, उत्तरेकडे ई. मोझेस मार्ग ते वरळीकडून धोबीघाट मार्गावरील उड्डाणपुलाची लांबी 639 मीटर इतकी आहे.
केबल स्टेड पुलाच्या दोन्ही बाजूंचे काम एकत्रितपणे सुरू आहे. रेल्वे हद्दीत पूलाचे काम करण्यासाठी लवकरच रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. केबल पुलाच्या स्पॅन बांधकामासाठी सुमारे 250 दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. ही सर्व कामे ऑक्टोंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आल्याचे पालिकेच्या पूल विभागातील वरिष्ठ अभियंत्यांनी सांगितले.