

बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या महिन्यातीलच ही तिसरी धमकी असल्याने पोलिसांनी तातडीने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. काल सकाळी त्यांच्या कार्यालयाबाहेर एका पोस्टरच्या माध्यमातून धमकीचे पत्र लावण्यात आले होते.
विशेष म्हणजे, या पत्रावर प्रेषक म्हणून 'संजय' नावाच्या पत्रकाराचे नाव लिहिलेले आढळले असून, त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसण्याची शक्यता तपासात पुढे आली आहे. या पत्रात आठ संशयितांची नावे नमूद असल्याचे स्रोतांकडून समजते आणि त्यांचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
आमदार उपाध्याय यांनी गेल्या काही महिन्यांपासून बोरिवली पश्चिम परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर मोठी कारवाई केली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर सतत दबाव, धमक्या आणि दोनदा हल्ल्याचे प्रयत्न झाल्याचा त्यांचा दावा आहे.
धमकीपत्र उघड होताच पोलिसांनी कार्यालयाबाहेर आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा कडक केली असून सीसीटीव्ही फुटेज, पोस्टर छपाई आणि हस्ताक्षर यांचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर पालकमंत्री आशिष शेलार हे आमदार उपाध्याय यांची भेट घेणार असून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. धमकीमागचा उद्देश, पत्र कोणी तयार केले आणि त्यात नमूद केलेल्या आठही व्यक्तींची भूमिका काय यावर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.