

मुरगुड नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर वातावरण पूर्णपणे तापले असून प्रभाग 3 मधील राजकीय संघर्ष चांगलाच चिघळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अमृता गौरव मोर्चे यांच्या घराबाहेर पहाटेच्या सुमारास भानामती, करणी आणि जादूटोणासारखा संशयास्पद प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संपूर्ण शहरात चर्चेला ऊत आला आहे.
अमृता मोर्चे यांचे निवासस्थान मुरगुडच्या मुख्य बाजारपेठेत आहे. नुकतेच, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रचारार्थ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत मोठी सभा मोर्चे यांच्या घरासमोरच झाली होती. नुकत्याच झालेल्या या भव्य सभेत प्रचंड उत्साह आणि गर्दी पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर अवघ्या 48 तासांतच पहाटेच्या वेळेस घराच्या दाराशी भानामतीचा संशय असलेले साहित्य आढळले
रविवारी पहाटे जेव्हा कुटुंबीयांनी घराचे दार उघडले, तेव्हा उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना पत्रावळींमध्ये ठेवलेले साहित्य स्पष्ट दिसत होते. त्यामध्ये नारळ, पाच ते सहा लिंबू, लिंबांना मारलेल्या टाचण्या, अंगारे, हळद-कुंकू, फुले अशा वस्तूंचा समावेश होता. हे साहित्य अंधारात कोणीतरी मुद्दाम ठेवून गेल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या घटनेचा निषेध करत अमृता मोर्चे यांचे पती विकास मोर्चे म्हणाले “निवडणूक जिंकण्यासाठी कोणी भानामती, जादूटोणा यासारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टींचा वापर करतो, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करतो.
पोलिसांनी तात्काळ तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी.” त्यांनी हे देखील सांगितले की हा प्रकार उमेदवारांना मानसिकदृष्ट्या घाबरवण्यासाठी किंवा प्रचारात अडथळा निर्माण करण्यासाठी केला असल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. याबाबत तपास सुरू असून लवकरच काही धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर प्रभाग 3 मध्ये राजकीय वातावरण आणखी ताणले गेले आहे.
निवडणुकीतील काट्याची लढत, प्रचारात वाढलेली तापटपणा, आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेमुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिकांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत सांगितले की,
“राजकारणात विकास, काम आणि मुद्दे असायला हवेत. अशा अंधश्रद्धेला जागा नाही.”
प्रकरण समजताच मोर्चे यांच्या घरासमोर समर्थकांची मोठी गर्दी जमली. अनेकांनी विरोधी गटावर संताप व्यक्त केला. काही समर्थकांनी पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार नोंदवण्याची मागणी केली.
या संपूर्ण घटनेमुळे मुरगुड नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
प्रचार जोरात असतानाच असा प्रकार घडल्याने हा मुद्दा आता निवडणुकीत चर्चेचा प्रमुख विषय ठरणार, यात शंका नाही.