

गारगोटी : म्हसवे (ता. भुदरगड) येथील अ{‘«ता राहुल खोत (वय 28) या विवाहितेने पती व सासूच्या सततच्या मानसिक -शारीरिक छळास कंटाळून विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पती राहुल राजेंद्र खोत व सासू अनिता राजेंद्र खोत (रा. म्हसवे) यांना भुदरगड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अम्रिताने 2020 मध्ये राहुल खोत याच्याशी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीची दीड - दोन वर्षे संसार सुरळीत होता; मात्र त्यानंतर तिच्या पतीकडून तसेच सासूकडून किरकोळ कारणावरून वाद - विवाद सुरू झाले. फेब—ुवारी 2025 मध्ये प्रसूतीसाठी राहुलने अम्रिताला माहेरी सोडले. त्यावेळी सासू अनिताबाई पळून जाऊन पैसा न मिळवता विवाह केल्याचे कारण देत सतत अम्रिताला टोमणे मारत होती. माहेरकडून पैसे आणण्याचा दबावही वाढत होता.
प्रसूतीनंतर पाच महिन्यांनी, ऑगस्ट 2025 मध्ये अम्रिताला पुन्हा सासरी नेण्यात आले. त्या काळात घरबांधणीसाठी माहेरकडून दोन ते तीन लाख रुपये आणावे, असा पती व सासूने तगादा लावला होता. यास नकार दिल्यावर अम्रिताला मारहाण करून बाळ घेऊन निघून जा अशा धमक्या दिल्या जात असल्याची माहिती अम्रिताने स्वतः आई - वडिलांना दिली होती. वादाच्या पार्श्वभूमीवर अम्रिताने दि. 17 रोजी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अम्रिताने पती व सासूच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद वडील अशोक पाटील यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अम्रितामागे पाच महिन्यांचा मुलगा आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे करीत आहेत.