Ganesh idol colour issue : गणेश मूर्तिकारांना महापालिकेकडून भिंतींच्या रंगाचे वाटप!

भाविकांची मर्जी सांभाळण्यासाठी रंगखरेदीचा भुर्दंड सोसावा लागणार
Ganesh idol colour issue
Ganesh idol colour issuepudhari photo
Published on
Updated on

मुंबई : राजेश सावंत

गणेश मूर्तींना कोणते रंग असावेत, याबाबत मूर्तिकारांशी संवाद न साधताच, मुंबई महानगरपालिकेने त्यांना रंगाचा पुरवठा केला. परंतु हे रंग मूर्तींचे नसून भिंतींचे असल्यामुळे हे रंग उपयोगात येणार नसल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचा मूळ हेतूच साध्य होणार नाही. दुसरीकडे हे रंग फिके पडण्याच्या शक्यतेने गणेश मूर्ती खरेदीसाठी येणाऱ्या भाविकांची मर्जी सांभाळण्यासाठी मूर्तीकारांना यंदा खिशाला भुर्दंड देत स्वखर्चांने रंगखरेदी करावी लागणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेकडून गेल्या काही वर्षापासून मूर्तिकारांना मोफत शाडूची माती दिली जात आहे. गेल्या वर्षीपासून मूर्तिकारांना इको-फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण पूरक रंगाचाही पुरवठा करण्यात येतो. यावेळी ही सुमारे ३ हजार लिटर रंगाचे वाटप करण्यात आले आहे. यात ऑरेंज, लाल, निळा, काळा, पिवळा आणि हिरवा या रंगांचा समावेश आहे. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयनिहाय मूर्तिकारांना या रंगाचे वाटप करण्यात आले आहे. परंतु हे रंग मूर्तीला रंगकाम करण्यासाठी योग्य नसल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

Ganesh idol colour issue
Mumbai railway bridge project : शीव स्थानकावरील पुलाचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

पालिकेकडून देण्यात आलेले रंग हे भिंतींना वापरले जाणारे रंग आहेत. त्यामुळे मूर्तीला रंग काढताना त्या रंगाची शेडच येणार नाही. एवढेच नाही तर मूर्तीला पालिकेने दिलेल्या रंगाने रंगवल्यास हे रंग लगेच पिके पडतील, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे मूर्तींच्या रंगकामासाठी या रंगाचा फायदा होणार नाही.

पालिकेने दिलेले रंग लावल्यास त्याचा गणेश मूर्ती व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो. मूर्तीला असलेले रंग फिके दिसल्यास भाविक त्या गणेश मूर्तीं घेणार नसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मूर्तिकारांना स्वतः खर्च करून रंग घ्यावे लागणार आहेत.

Ganesh idol colour issue
Manvel Gaikwad Financial Crisis : ‘जवा नवीन पोपट हा...’ सह हजारो गाणी लिहिणाऱ्या मानवेल गायकवाड हलाखीत

गणेश मूर्तींसाठी पालिका प्रशासनाकडून भिंती रंगविण्याचे कलर पुरविण्यात आल्याने मूर्तीकारांकडून नाराजीचा सूर आळविला जात आहे. या रंगामुळे मूर्तीचा रंग गणेशोत्सवात उडाल्यास भक्त मूर्ती खरेदीसाठी न येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दोन लाखांच्या घरात घरगुती गणेशमूर्ती

पालिकेच्या रंगांमुळे मुंबई महानगरपालिकेचा पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा हेतू साध्य होणार नाही. मुंबई शहर व उपनगरात सरासरी १ लाख ९६ हजार पेक्षा जास्त घरगुती गणपती आहेत. तर सार्वजनिक गणेश उत्सवाची संख्या सुमारे १५ हजार इतकी आहे. या गणेश मुर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात रंगाची आवश्यकता असते. मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षी पुरवलेल्या इको फ्रेंडली रंगामुळे मूर्तिकारांचा आर्थिक भार कमी झाला होता. मात्र यावेळी लाखो रुपये खर्च करून रंग खरेदी करावे लागणार आहेत.

२५, ४०० लिटर रंग खरेदी

शाडूच्या मातीसह नैसर्गिक रंग मूर्तीकरांना देण्यात येत आहेत. २०२५ मध्ये १० हजार ८०० लिटर पर्यावरण पूरक रंगाचे मोफत वाटप करण्यात आले. मात्र रंगाची मागणी जास्त असल्यामुळे ऐनवेळी हे रंग मुंबई महापालिकेला पुरवता आले नाही. त्यामुळे काही मूर्तिकारांनी अनैसर्गिक रंगाने शाडूच्या मुर्त्या रंगवल्या. याची दखल घेत मुंबई महानगरपालिकेने यावेळी दुप्पट पेक्षा जास्त म्हणजे २५ हजार ,४०० लिटर रंग खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरगुती गणेश मूर्तींसाठी पर्यावरणपूरकला पसंती

गेल्या पाच वर्षापासून गणेश भक्तांनीच पर्यावरण पूरक मुर्त्यांना पसंती दर्शवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता घरगुती गणेश मुर्त्या ८० टक्के पर्यावरण पूरक झाल्या आहेत. गणेश मूर्ती घडवण्यासाठी शाडूची माती उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ही माती स्वखर्चाने उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून ही माती मुंबईत आणली जाते.

गणेश मूर्तींना नेमके कोणते कलर हवेत, हे मूर्तिकारांना माहीत असते. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन, रंगाची खरेदी करणे आवश्यक आहे. सध्या दिलेले रंग मूर्तींसाठी योग्य नाहीत. सिंथेटिक रंगावर पोस्टर कलरचे शेड नीट बसत नाहीत. त्यामुळे पुढील वर्षी किमान डिस्टेंपर किंवा प्लास्टिक वॉटरप्रूफ रंग उपलब्ध करून द्यावेत.

सुधीर गोविंद मयेकर, (विद्याविहार), मूर्तिकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news