

मुंबई : शीव स्थानकाजवळच्या रेल्वेवरील पूल मध्य रेल्वेमार्फत मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत उभारण्यात येत आहे. रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे विभागामार्फत तर महानगरपालिका हद्दीतील पोहोच मार्गाचे नूतनीकरण व मजबूतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहे.
या पुलाचे पुनर्बांधणीचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. मात्र, तत्पुर्वी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
मुंबई महापालिकेमार्फत शीव पूलाच्या पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहीदास मार्ग (धारावी) पर्यंतच्या पोहोच रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम प्रगतिपथावर आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावर पादचाऱ्यांसाठी नवीन भुयारी मार्ग बांधण्यात आला असून पादचाऱ्यांसाठी २० फेब्रुवारी २०२६ रोजी खुला करण्यात आला आहे. तसेच संत रोहिदास मार्गावर पादचाऱ्यांसाठी भूयारी मार्गाची पुनर्बांधणी कामाचे काम पूर्ण झाले असून पादचाऱ्यांसाठी १४ जुलै २०२६ रोजी खुला करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेमार्फत पहिल्या गर्डरच्या डेक स्लॅबचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच, दुसरा गर्डर ९ ऑगस्ट २०२६ रोजी लोहमार्गावर लॉन्च करण्यात आला आहे. या गर्डर जागेवर म्हणजेच पुलाच्या बेअरींगवर प्रस्थापित केल्यानंतर मध्य रेल्वेमार्फत डेक स्लॅबचे काम हाती घेण्यात येईल.
मध्य रेल्वेच्या समन्वयाने काम
या पूलाच्या पूर्वेकडील जागा अद्याप मध्य रेल्वे प्रशासनाच्या कंत्राटदारामार्फत रेल्वेच्या कामासाठी वापरण्यात येत आहे. ही जागा रेल्वे प्रशासनाकडून मुंबई महापालिकेला पोहोच रस्त्याच्या कामासाठी हस्तांतरीत केल्यानंतर साधारण त्यानंतर ४५ दिवसात पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. तसेच, मध्य रेल्वे सोबत समन्वय साधून या पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न महापालिका प्रशासनाचे सुरु आहे.