

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अभियंता संवर्गातील ऑनलाइन बदल्यांनंतर आता बदली झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पाच दिवसांच्या आत जुन्या विभागातून कार्यमुक्त होऊन नव्या विभागात रुजू व्हावे, असे स्पष्ट निर्देश नगर अभियंता विभागाने दिले आहेत. निर्धारित मुदतीत कार्यमुक्त न झाल्यास संबंधितांचे वेतन व भत्ते मूळ खात्यातून काढता येणार नाहीत. तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि खातेप्रमुखांनाही जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महापालिका आयुक्तांच्या मंजुरीनुसार जारी करण्यात आलेल्या निर्देशांमध्ये बदली प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. बदलीचे आदेश मिळाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव संबंधित कर्मचाऱ्याने रजेवर गेल्यास त्याचे वेतन व भत्ते मूळ खात्यातून काढू नयेत. तसेच कार्यमुक्त केल्याच्या टिपणीसह बदली झालेल्या विभागाला त्याबाबत कळवावे. संबंधित कर्मचारी रजेवरून परतल्यानंतर त्याला पुन्हा मूळ ठिकाणी हजर करून घेऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बदलीसाठी राजकीय दबाव आणल्यास कारवाई :
बदली करण्यासाठी किंवा बदली रद्द करण्यासाठी शिफारस अथवा दूरध्वनीद्वारे प्रशासनावर शासकीय, अशासकीय, राजकीय किंवा अन्य व्यक्तींकडून दबाव आणल्यास संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर मुंबई महापालिका सेवा (वर्तणूक) नियम १९९१ मधील नियम २१ अन्वये शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ऑनलाइन बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीतही कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.