

नवी दिल्ली / नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा
गेली अनेक वर्षे स्वच्छ शहर म्हणून हुलकावणी देणारा पहिला क्रमांक नवी मुंबईने अखेर ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर पटकावला. केंद्र सरकारच्या २०२५-२६च्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या 'सुपर स्वच्छ लीग'मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, महाराष्ट्रातून विटा आणि पाचगणी या शहरांनीही विविध लोकसंख्या गटांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. कोकणातून रत्नागिरी नगरपरिषदेने स्वच्छ तटीय शहरांच्या श्रेणीत तृतीय क्रमांक मिळवला. तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने राज्यातील प्रथम स्वच्छ शहराचा बहुमान मिळवला आहे.
बुधवारी भाऊबीजेच्या दिवशी दिल्लीत विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी, उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या उपस्थितीत हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांचीही उपस्थिती होती.
नवी मुंबईची कामगिरी
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणातील प्रतिष्ठेच्या 'सुपर स्वच्छ लीग' श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. प्रभावी कचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, स्वच्छ सार्वजनिक परिसर आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या बाबींमध्ये केलेल्या कामगिरीमुळे नवी मुंबईला हा बहुमान प्राप्त झाला. या श्रेणीत गुजरातमधील सुरतने देशात द्वितीय, तर आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहराने तृतीय क्रमांक मिळवला.
सुपर स्वच्छ लीग
१ नवी मुंबई, महाराष्ट्र
२ सुरत, गुजरात
३ विजयवाडा, आंध्रप्रदेश
स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी
स्वच्छता हा केवळ सार्वजनिक परिसराच्या सौंदर्याचा विषय नसून ● नागरिकांचे आरोग्य, सामाजिक संवेदनशीलता आणि प्रशासकीय जबाबदारीशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. 'बढाएं हाथ, करें सफाई साथ' या संकल्पनेतून नागरिकांच्या सक्रिय सहभागाने स्वच्छतेची चळवळ अधिक व्यापक करावी.
- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
नवी मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. हा पुरस्कार मी समस्त नवी मुंबईकर नागरिकांना आणि यासाठी सर्वाधिक काम करणा-या स्वच्छतामित्रांना आणि स्वच्छतासखींना अर्पण करीत आहे.
- सुजाता पाटील, महापौर नवी मुंबई
सर्व नागरिकांच्या आणि स्वच्छता कामगारांच्या कामाचे हे यश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची स्वच्छताकार्याला दिलेली जोड आणि नागरिकांचा लाभलेला सक्रिय सहभाग याचा सखोल विचार राष्ट्रीय पातळीवर झाला आणि नवी मुंबई देशात प्रथम क्रमांकाच्या शहराची मानकरी ठरली. तसेच सप्ततारांकित कचरामुक्त शहर (जीएफसी) आणि वॉटर प्लस प्रमाणपत्र ही ओळख नवी मुंबईने कायम राखली आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त
पर्यटननगरी पाचगणीनेही 20 हजार पेक्षा कमी असलेल्या लोकसंख्येच्या लहान शहरांच्या श्रेणीत द्वितीय क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर गौरवास्पद यश संपादन केले आहे. रत्नागिरीला तृतीय क्रमांक कोकणातील सत्नागिरी नगरपरिषदेने स्वच्छ तटीय शहरांच्या श्रेणीत देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे. किनारपट्टीची स्वच्छता, सागरी प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडला बहुमान पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला 'स्टेट फर्स्ट स्वच्छ सिटी' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
शहरातील नियमित कचरा संकलन, स्वच्छता सेवा, सार्वजनिक परिसराचे सुशोभीकरण, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकाभिमुख उपक्रमांमुळे महानगरपालिकेने ही कामगिरी केली आहे. शहरी कचरा प्रक्रियेचे प्रमाण ८० टक्क्यांवर केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात झालेल्या प्रगतीची माहिती दिली. वर्ष २०१४ मध्ये शहरी कचऱ्यावर केवळ १६ टक्के प्रक्रिया होत होती. हे प्रमाण आता ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. देशातील २६ टक्क्यांहून अधिक घरांमधून घरपोच कचरा संकलन केले जात असून, ४ हजार ७५१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची व्याप्ती पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.