

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांकडून नवीन चेहरे देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे 2017 मध्ये निवडून आलेल्या निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवकांना घरी बसावे लागणार आहे. यात काहींना प्रभाग आरक्षणामुळेही उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे कोणाचा पत्ता कट होणार व कोणाला पुन्हा संधी मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार सांभाळणाऱ्या मुंबई महापालिकेच्या गादीवर बसण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने सक्रिय झाले आहेत. ही निवडणूक शिवसेना ठाकरे गटासाठी विशेष प्रतिष्ठेची आहे.
1997 पासून 2022 पर्यंत सलग महापालिकेच्या सत्तेवर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला यावेळी शिवसेनेतून फुटून गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या सक्षम व जनमानसात प्रतिष्ठित असलेल्या माजी नगरसेवक अथवा कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते.
शिवसेना ठाकरे गट व मनसे यांच्यामध्ये युती होणार असल्यामुळे प्रभाग वाटपामध्ये काही माजी नगरसेवकांना माघार घ्यावी लागणार आहे. तर काही कामचुकार नगरसेवकांसह जनतेला पसंत नसलेल्या माजी नगरसेवकाला घरी बसवण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
मुंबई शहर व उपनगरांतील 227 नगरसेवकांपैकी किमान 50 टक्के म्हणजे 100 ते 110 नगरसेवकांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. यात भाजपासह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना, काँग्रेस या पक्षांतील माजी नगरसेवकांचा समावेश आहे. भाजपाने 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेतला असून यात काही नगरसेवकांचे काम अथवा जनसंपर्क विशेष समाधानकारक दिसून आला नाही.
अशा किमान 20 ते 25 नगरसेवकांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आरक्षणामध्ये प्रभाग गमावलेल्या व आजूबाजूला अन्य प्रभाग नसल्यामुळे अभ्यासू नगरसेवकालाही वेळ पडल्यास घरी बसावे लागणार असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. शिवसेना ठाकरे गटही काही माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेकडे एकही माजी नगरसेवक राहिला नसल्यामुळे त्यांना नव्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. काँग्रेसमध्येही काही माजी नगरसेवकांना घरी बसवण्यात येणार असल्याचे समजते.