

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जानेवारी 2026 मध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवार, 11 नोव्हेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, तळमजला, ऑडिटोरियम हॉल, रोड क्र. 24 व 32 च्या नाक्याजवळ, नॅशनल कॉलेजच्यासमोर, वांद्रे, (प.), येथे काढण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 सोडत व आरक्षण प्रसिद्धी जाहीर सूचना पालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. पालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे.
आरक्षणाचे प्रारूप शुक्रवार, 14 नोव्हेंबर, 2025 प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी शुक्रवार, 14 नोव्हेंबर, 2025 ते गुरुवार, 20 नोव्हेंबर, 2025 (दुपारी 3.00 वाजेपर्यंत) असणार आहे. या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी विभागात असलेल्या पालिकेच्या विभागीय कार्यालयातील सहाय्यक कर निर्धारक व संकलक यांचे कार्यालय निश्चित करण्यात आले आहे. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.