

BMC Election 2026
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची घोषणा आज (दि. २८) करण्यात आली. यावेळी मुंबईत किती जागांवर निवडणूक लढविणार हेही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक पार्टनर आहेत.आमची नैसर्गिक आघाडी होत आहे.समविचारी पक्षांसोबत आम्ही जाणार आहोत.काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष आता मित्रपक्ष म्हणून राहतील.आजपासून नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे.संविधानवादी शक्तींना एकत्र करून आम्ही पुढे जाऊ.हा संख्येचा खेळ नाही, तर विचारांचा मेळ आहे."
"१९९८ मध्ये १३ महिन्यांचे सरकार असताना आमची आघाडी होती. मात्र, १९९९ नंतर समान वैचारिक भूमिका असूनही आम्ही एकत्र नव्हतो. आज २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा समविचारी पक्ष एकत्र येत आहेत याचा मला आनंद आहे. आमच्या मतांमध्ये कदाचित भिन्नता आली असेल, पण मनं कधीच भिन्न नव्हती. ही लढाई केवळ आकड्यांची किंवा सत्तेची नसून ती 'संविधानवादी' विचारांची आहे. काळाची गरज ओळखून परिवर्तनासाठी हा निर्णय घेतला आहे, असेही सपकाळ यांनी सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी माहिती दिली की, मुंबई महानगरपालिकेसाठी वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. जर हा प्रयोग २०१४ मध्येच झाला असता, तर आज भाजप देशाच्या मानगुटीवर बसली नसती. आज आम्ही अधिकृतपणे या युतीची घोषणा करत आहोत."
सुरुवातीला काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, मात्र सविस्तर चर्चेनंतर 'विवाद नको, विकास हवा' ही भूमिका घेत आघाडीचा निर्णय घेण्यात आला. या युतीला मूर्त स्वरूप देण्यात डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांचा मोठा वाटा आहे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.