

मुंबई : मुंबई महापालिकेचं तब्बल 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवींपैकी तब्बल 36 हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेचं यंदाचं बजेट सादर करताना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्याबाबतचं सूतोवाच केलंय. त्यामुळं सत्ताधारी महायुती आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिकेकडे आजमितीला 81 हजार 449 कोटी 32 लाख रुपयांच्या एकूण ठेवी शिल्लक आहेत. त्यापैकी 44 हजार 826 कोटी 23 लाख रुपये बांधील दायित्वापोटी राखीव असल्यामुळे त्या पालिकेला तोडता येणार नाहीत. मात्र उर्वरित 36 हजार 623 कोटी 09 लाख रुपये विविध विकास प्रकल्पांसाठी खर्च करणार असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट झालंय. गेली अनेक दशके मुंबई महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व होतं. आता सत्ताबदलानंतर आणि विशेषतः भाजपचा महापौर झाल्यानंतर मुदत ठेवी मोडण्यात येणार असल्यानं त्यावरून वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे.
देणी भागवण्यासाठी मुदत ठेवी मोडण्याची वेळ?
मुदत ठेवींपेक्षा तब्बल तिप्पट म्हणजे सुमारे 2 लाख 44 हजार कोटी रुपयांची देणी मुंबई महापालिकेच्या शिरावर आहे. पालिकेच्या विविध प्रकल्पांची आणि विकासकामांपोटीची ही देणी अजून महापालिकेला भागवता आलेली नाहीत. कोस्टल रोड, जलबोगदे, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता, रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच पुलांची उभारणी यासाठीची देणी अजून दिलेली नाहीत. त्याशिवाय दैनंदिन देखभालीच्या कामांची देणीही दिलेली नाहीत. त्यामुळेच मुदत ठेवी मोडण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आल्याचं सांगितलं जातंय.
सरकारकडे 10,948 कोटींची थकबाकी
दरम्यान, राज्य शासनाकडे मुंबई महापालिकेची थकबाकी तब्बल 10 हजार 948 कोटी 58 लाख रुपये इतकी आहे. राज्यात आणि मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार आहे. त्यामुळं ही थकबाकी राज्य सरकार मुंबई महापालिकेला देणार का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.
कोणत्या कामांसाठी किती तरतूद?
कोस्टल रोडजवळ 53 हेक्टरचं उद्यान - 950 कोटी
वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड - 4,000 कोटी
नवीन पूल उभारणी - 9,650 कोटी
गोरेगाव मुलुंड लिंक रोड - 2,650 कोटी
महापालिका रुग्णालये -1,062 कोटी
मिठी नदी प्रकल्पाची कामे - 286.25 कोटी
स्मार्ट वाहनतळ उभारणी - 6875 कोटी
बेस्ट उपक्रम - 1000 कोटी