

मुंबई: मुंबई महापालिकेने आपल्या विविध विभागांतील चालकांची गरज भागववण्यासाठी बेस्टकडून १९० चालक उसनवारीवर घेण्याचे ठरवले असून या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. ३० कोटी ६२ लाख रुपयांचा हा प्रस्ताव असून यानुसार प्रतिचालक महापालिका महिन्याला १ लाख २९ हजार मोजणार आहे.
या प्रस्तावला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, आणि एमआयएमच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. मात्र विरोधकांचा सर्व आक्षेप आणि सूचना फेटाळून सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक यशोधन फणसे यांनी या प्रस्तावावर जोरदार आक्षेप घेतले. बेस्टकडून आपण जे चालक घेतोय, त्यांच्यासाठी प्रतिमहिना १ लाख २९ हजार रुपये खर्च येणार आहे.
हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यापेक्षा पालिकेने नवीन ड्रायव्हर भरती करावी अशी सूचना केली. तसेच बेस्टचे चालक बसून आहेत म्हणून त्यांचे पालनपोषण आपण का करायचे? असाही गंभीर प्रश्नही उपस्थित केला.
यानंतर काँग्रेसचे अशरफ आजमी यांनी, महापालिकेत ५० हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असताना ती भरली जात नाहीत; मग केवळ ड्रायव्हरसाठीच इतका अवाढव्य खर्च का केला जात आहे? असा सवाल केला. तर एमआयएमच्या जमीर कुरेशी यांनी पालिकेतील सर्व ५७ हजार रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) डॉ. सईदा खान आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रद्धा जाधव यांनीही विरोध केला.
काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांनी सुरक्षेचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. शेकडो अधिकारी आणि नागरिकांचे जीव या चालकांच्या हातात असणार आहेत. अलीकडे बेस्टचे अपघात वाढले असून मालमत्तेचे नुकसान होत आहे; याची जबाबदारी कोण घेणार? अशा प्रश्न केला.
सदस्यांच्या या रोषाला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी वस्तुस्थिती मान्य केली. सदस्यांनी मांडलेली बाब खरी आहे आणि अपघात वाढल्याचेही खरे आहे.
मात्र, प्रत्येक वॉर्डात चालकांची तत्काळ गरज आहे. बेस्टच्या चालकांकडे सर्व परवाने (लायसेन्स) तयार असतात. सदस्यांच्या भावना आम्ही बेस्ट प्रशासनाला नक्की कळवू, असे विरोधी सदस्यांना आश्वासीत केले.शेवटी, विरोधकांचा तीव्र विरोध डावलून हा बहुचर्चित प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
बेस्टकडे आठ हजार चालक
बेस्ट परिवहन सेवेत कंत्राटी चालक ५ हजार तर कायमस्वरुपी ३ हजार असे आठ हजार चालक कार्यरत आहेत. एका कंत्राटीचालकाला २० ते २२ हजार तर कायमस्वरुपी असलेल्या चालकांना ४० ते ४५ हजार रुपये वेतन आहे.
याबरोबरच त्यांना सर्विसनुसार आणि ग्रेटनुसार पगार वाढ मिळते. सन २०२० ते आतापर्यंत सुमारे २५०० चालक सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच बेस्ट परिवहन मालकीच्या गाड्या २१५ आहेत तर कंत्राटी सुमारे ३ हजार आहेत.
बेस्ट चालकांना काम नसल्यामुळे बसून पगार द्यावा लागत आहे. त्यामुळे याचा आर्थिक भार बेेस्टला सहन करावा लागत आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरूपात त्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्यात येत आहे. बेस्ट चालकांना मूळ पगार ८४ हजार ३४ रुपये असून महापालिकेत अतिकालीन काम करावे लागणार असल्यामुळे हा पगार महिना १ लाख २९ हजार १४८ रुपये इतका होणार आहे. पण नवीन चालकांची भरती होईपर्यंतच म्हणजे येणाऱ्या दहा महिन्यापर्यंत या बेस्ट चालकांना महापालिका सेवेत घेण्यात येणार आहे.
- प्रभाकर शिंदे, अध्यक्ष, स्थायी समिती