

मुंबई: महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी) मार्फत सन २०२६ या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत केलेल्या कारवायांमध्ये महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक सापळे रचण्यात आल्याचे समोर आले आहे.
त्याखालोखाल पोलीस, ग्राम पंचायत, महावितरण, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, शिक्षण, आरोग्य आणि इतर शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले.
एसीबीच्या आकडेवारीनुसार, राज्यभर जून २०२६ अखेर ३९६ सापळे रचून कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये ५७६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून त्यात ८२ हून अधिक खासगी व्यक्तींचाही समावेश आहे.
महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी आणि भूमिअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांविरोधात सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकाऱ्याला जमिनीचा पंचनामा न करण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी १.९५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, याची मोठी चर्चा झाली होती.
जमिनीचे फेरफार, ७/१२ उतारे, वारस नोंद, बिनशेती परवानगी, मोजणी आणि इतर महसुली कामांसाठी लाच मागितल्याच्या तक्रारींवरून हे सापळे रचण्यात आले तसेच, पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही विविध प्रकरणांमध्ये कारवाई टाळणे, गुन्ह्यात मदत करणे किंवा इतर प्रशासकीय कामांसाठी लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
तर १२०० रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, महापालिका आणि नगर परिषदांतील अधिकारी बांधकाम परवानग्या, मालमत्ता कर, परवाने आणि विविध प्रशासकीय कामांसाठी लाच स्वीकारताना पकडले गेले.