

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संवाद होता. दत्तोपंत ठेंगडी, मोरोपंत पिंगळे यांच्याशी त्यांचा नित्य संपर्क होत असे. 1935 व 1939 मध्ये पुणे येथे झालेल्या संघ शिक्षा वर्गास आंबडेकर यांनी भेटही दिली होती, असा दावा भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये उपाध्ये यांनी संघ आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील संपर्क, संवाद यावर भाष्य केले आहे. 1954 मध्ये डॉ. आंबेडकर यांनी भंडारा लोकसभा निवडणूक लढविली होती, त्यात संघ स्वयंसेवकांनी डॉ. आंबेडकर यांचा प्रचार केला होता. काँग्रेसने मात्र त्यांना पराभूत केले हा इतिहास आहे, असेही उपाध्ये यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. उपाध्ये यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मध्यतंरी अमरावतीमध्ये श्रीमती कमलाताई गवई या संघाच्या व्यासपीठावर जाणार म्हणून मोठा गदारोळ निर्माण केला गेला. संघ व आंबेडकरी विचार हे विरोधी असल्याने त्या संघाच्या व्यासपीठावर जाणार यावर घमासान चर्चा झाली. पण प्रत्यक्षात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार आणि संघ विचार यात खरच अंतर आहे? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. मार्ग वेगळे, मात्र दिशा एकच होती. या देशातील पुरोगामी वर्गाने नेहमी हीच मांडणी केली की डॉ. आंबेडकर यांच्या कामाला संघाने, हिंदुत्ववादी शक्तीनी नेहमीच विरोध केला. मुळात ही मांडणीच चूक आहे. डॉ. आंबेडकरांनी भारतीय मूल्यांचे संवर्धन केले, ही वस्तुस्थिती आहे. संघदेखील हेच काम करीत आला आहे.
‘आर्य बाहेरून आले’ ही पुरोगामी वर्गाची नेहमीची थाप हीच सर्वत्र रुजवली गेली. आर्य बाहेरून आले, व स्थानिक म्हणजे मुलनिवासी असा एक संघर्ष करत त्यावरून हिंदूमध्ये भांडणे लावण्याचं काम नेहमी केले गेले. प्रत्यक्षात डॉ. आंबेडकर हे मात्र त्या मताशी सहमत नव्हते. आर्य बाहेरून आले आहेत हा सिध्दांत सापाला ठेचून मारल्याप्रमाणे मारला पाहिजे, असे डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे. (संदर्भ- हू वेअर द शुद्राज खंड 7 प्रकरण 5 पान क्र 86) आर्यानी बाहेरून आक्रमण केल्याचा कोणताही पुरावा ऋवेदामध्ये सापडत नाही. (संदर्भ हु वेअर द शुद्राज पान क्र 74), अशी अजूनही उदाहरणे आहेत.