विद्यार्थी आणि युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख केवळ भारतात नव्हे तर जगाच्या पाठीवर
Dr. Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर Pudhari File Photo
Published on
Updated on
प्रशांत वाघाये, दिल्ली

आजच्या विद्यार्थ्यांकडे, युवकांकडे अनेक शैक्षणिक साधने आहेत. शिक्षणाच्या विविध संधी आणि इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. असे असतानाही 'डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन आलंय' असे शब्द आपल्या कानावर पडतात. काही लोक नकारात्मकतेच्या गर्तेत अडकून आयुष्य संपवण्याचाही विचार करतात. मात्र २१ व्या शतकात एवढी साधने उपलब्ध असताना आपल्या मनात असे विचार येत असतील तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा शिक्षण घेतले तेव्हाची काय परिस्थिती असेल याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख केवळ भारतात नव्हे तर जगाच्या पाठीवर आहे. भारतासारख्या जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या देशाला जगातील सर्वात मोठी आणि आदर्श राज्यघटना ज्या महामानवाने दिली त्या महामानवाच्या आयुष्यात अगदी सुरुवातीपासून अनेक संकटे आ वासून उभी होती मात्र त्या प्रत्येक संकटांना तोंड देत, त्यावर मात करत बाबासाहेब आंबेडकर वाट चालत राहिले. आपल्या सबंध आयुष्यात त्यांनी देशासाठी प्रचंड मोठे योगदान दिले. आणि म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी आणि सर्वच समाज घटकांसाठी प्रेरणादायी आहे.

दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारत देशासह जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. मात्र त्यांची जयंती केवळ एक औपचारिकता म्हणून साजरी न करता त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांनी दिलेल्या मूल्यांची जाणीव नव्या पिढीला करून देणे, ही काळाची गरज आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाकडे फक्त इतिहास म्हणून न पाहता एक प्रेरणास्रोत म्हणून पाहायला हवे. बाबासाहेबांना लहानपणापासूनच सामाजिक विषमतेचा सामना करावा लागला. शाळेत बसायला जागा नसायची, पाणी पिण्यासाठीही इतरांची मदत घ्यावी लागायची. असे कटू अनुभव त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग होते. मात्र या सर्व वागणुकीवर त्यांनी शिक्षणाच्या बळावर मात केली. शिक्षण हेच या सगळ्या गोष्टीतून मुक्तीचे साधन आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यातून सिद्ध केले.

बाबासाहेबांनी केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमधून शिक्षण घेतले. जगाच्या पाठीवरील प्रख्यात कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा संस्थांमधून त्यांनी शिक्षण घेतले, डॉक्टरेट प्राप्त केली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही त्यांनी ज्ञानाची कास धरली आणि स्वकर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केले. बाबासाहेबांनी केवळ स्वतःसाठी शिक्षण घेतले नाही तर संपूर्ण समाजासाठी त्याचा उपयोग केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यासह बहुजन समाजाचे नेते, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, पत्रकार आणि विचारवंत अशी त्यांची विविधांगी ओळख आहे.

आज २१ व्या शतकात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. डिजिटल शिक्षण, ऑनलाईन क्लासेस, शिष्यवृत्ती, मोफत शाळा-कॉलेजेस या सर्व गोष्टींमुळे शिक्षण अधिक सुलभ झाले आहे. मात्र तरीही आज शिक्षणाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी न मिळवता समाजाच्या उत्थानासाठीही मिळवलं पाहिजे हेही समजून घेण्याची गरज आहे. शिक्षण हे समाज घडवण्याचे माध्यम आहे हे बाबासाहेबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. आज विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. त्यांनी लिहिलेली, वाचलेली हजारो पुस्तके, त्यांनी लिहिलेल्या संशोधनग्रंथ वाचले पाहिजेत. त्यांच्या वाङ्मयातून प्रेरणा घ्यायला पाहिजे. अलिकडे, सोशल मीडियाचा अतिवापर, तात्पुरती करमणूक आणि यशाचे शॉर्टकट अशा चुकीच्या प्रवृत्ती वाढू पाहताहेत. त्यामुळे मेहनत, चिकाटी, आणि जिद्द यांचा अभाव जाणवतो. या पार्श्वभूमीवरही बाबासाहेबांचं जीवन आपल्याला सर्वार्थाने प्रेरणादायी आहे.

आजच्या युवकांनी बाबासाहेबांच्या जीवनातून बोध घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. बाबासाहेबांनी केवळ आपलं आयुष्य घडवलं नाही तर संपूर्ण वंचित समाजासाठी लढा दिला, लाखो करोडो लोकांच्या आयुष्याला कलाटणी दिली. आज आपण जे अधिकार वापरतो ते बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहेत. शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय यांचा पाया बाबासाहेबांनी रचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समाज उजळून टाकणारा एक विचार, चळवळ आणि प्रेरणा आहेत. त्यांनी दाखवलेला मार्गावर विद्यार्थ्यांनी, युवकांनी मार्गक्रमण केल्यास त्यांचे व्यक्तिगत आयुष्य तर समृद्ध होईलच, त्यासोबत एक सशक्त समाज देखील निर्माण होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news