

मुंबई ः कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार म्हणजेच ‘दशावतार’. या चित्रपटाची निवड 98 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेत अधिकृतपणे निवड झाली आहे. जगभरातील हजारो चित्रपटांतून निवडल्या गेलेल्या 150 चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे.
दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दशावतार’ सिनेमाने 2025 मध्ये तिकीटबारीवर विक्रमी कमाई केली होती. कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचे ‘दशावतार’ यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाले. चतुरस्त्र अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबुली मिस्त्रीच्या भूमिकेत गहिरे रंग भरले. यामुळे या चित्रपटाचे सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटात प्रभावळकर यांच्याखेरीज महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, रवी काळे, विजय केंकरे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर आणि कोकणातील काही स्थानिक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
मेहनतीला फळ आले ः दिग्दर्शक खानोलकर
याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. आज ‘दशावतार’ ऑस्करच्या म्हणजेच ॲकॅडमी ॲवॉर्डस्च्या मुख्य स्पर्धेत निवडला गेल्याची बातमी समजली आणि गेली अनेक वर्षे आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याची दखल घेतली गेल्याचे समाधान लाभले.