

भिवंडी : भिवंडीत भाजप आणि कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी रात्री बेदम हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने परिस्थिती तणावाची झाली. याप्रकरणी माजी महापौर विलास पाटील यांसह 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 44 जणांना अटक करण्यात आली आहे.
कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर. पाटील यांनी प्रभाग क्र. 1 मध्ये विजय होताना तेथे भाजपाचे आ. महेश चौघुले यांचा पुत्र मित याचा दारुण पराभव केला. त्यानंतर कोंबडपाडा परिसरात तणावाचे वातावरण असताना रविवारी रात्री 10 च्या सुमारास विलास पाटील यांच्या घरावर दगडफेक करत हल्ला केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट समोरासमोर भिडल्याने दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी लाठीमार करीत जमाव पांगवला. त्यानंतर पहाटे विलास पाटील यांच्या बंगल्यात बसलेल्या 35 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर आ. महेश चौघुले गटातील 8 जणांना ताब्यात घेऊन सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर केले.
या राड्यानंतर रात्रभर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आ. महेश चौघुले गटाचे भावेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजी महापौर विलास पाटील यांच्यासह 150 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विलास पाटील गटाचे हर्ष वरळीकर यांच्या तक्रारीवरून चैतन्य पुल्लेवार व इतर 20 जणांविरोधात निवडणूक जिंकल्याचा राग मनात ठेऊन रत्नदीप बंगला येथे हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. तिसरा गुन्हा हा राजू तडका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजपा उमेदवार रितेश टावरे व त्यांच्या 100 ते 150 अज्ञात लोकांविरोधात घरावर हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पोलिसांकडून निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांनी विलास पाटील व त्यांचे 100 ते 150 तर भाजपा उमेदवार रितेश टावरे व त्यांचे 30 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, ॲड. मयुरेश पाटील हे सदस्य असलेल्या भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी दुपारी गोकुळ नगर येथील विलास पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करत निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी ॲड.किरण चन्ने यांनी केली.
रविवारी सायंकाळी उशीरा विलास पाटील आपल्या मतदारांचे आभार मानत असताना भाजपा आमदार समर्थकांनी विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्याची माहिती समजताच विलास पाटील व त्यांच्या समर्थकांनी आ. महेश चौघुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून आ. चौघुले समर्थकांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला.