

भिवंडी: रस्त्याच्या कडेला उभे राहून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर शेरेबाजी आणि टोमणेबाजी करणाऱ्या तरुणांना जाब विचारणे एका ६५ वर्षीय वृद्ध रिक्षाचालकाच्या जीवावर बेतल्याची संतापजनक घटना भिवंडीत घडली आहे.
शेरेबाजीचा जाब विचारल्याच्या रागातून तरुणांच्या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत जमील अहमद मोमीन (६५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुना ठाणे रोड येथील समदनगर परिसरात जमील अहमद मोमीन हे वास्तव्यास होते. ते समदनगर परिसरातून जात असताना रस्त्याच्या कडेला काही तरुण उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर शेरेबाजी करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नागरिकांना त्रास देणाऱ्या या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी जमील अहमद मोमीन हे त्या तरुणांकडे गेले.
मात्र, त्यांनी जाब विचारताच तरुणांसोबत त्यांची जोरदार बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर परिस्थिती अचानक चिघळली. काही तरुणांनी जमील अहमद मोमीन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.
दरम्यान, मारहाणीचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून घटनेची माहिती आणि हल्लेखोरांची भूमिका तपासली जात आहे.
दोन संशयित ताब्यात
भिवंडी शहर पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.
या हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग होता का, मारहाणीमागील नेमके कारण काय होते आणि हल्ल्याची तीव्रता किती होती, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
टोळक्यांना वेळीच आवर घाला
नागरिकांवर शेरेबाजी करणाऱ्यांना जाब विचारल्याने एका वृद्धाचा जीव गेल्याने समदनगर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास देणाऱ्या टोळक्यांना वेळीच आवर घालण्याची मागणीही परिसरातील नागरिकांकडून होत आहे. वृद्ध रिक्षाचालकाला झालेल्या या मारहाणीने परिसरातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.