Bhandup Hawkers Issue
मुंबई : मुंबई महापालिकेच्या एस वॉर्डमधील भांडुप हे कोंडीचे जंक्शन बनले आहे. रेल्वे स्टेशनसह इतर रस्त्यांवर पादचार्यांना चालण्यासाठी पदपथच शिल्लक राहिले नाहीत. फेरीवाले, दुकानदारांनी त्यावर कब्जा केला आहे. तर रस्त्यावर चालायचे तर बेशिस्त रिक्षाचालक कधी आंगावर येईल याचा नेम नाही. त्यामुळे भांडुपची पुरती कोंडी झाली आहे.
हा सर्व प्रकार गेली अनेक वर्षे महापालिका व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू आहे. मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. उलट त्यांना अभय दिले जात आहे. त्यामुळे भांडुपची कोंडी फुटणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या एस वॉर्डमध्ये भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी परिसर येतो. अतिशय वर्दळ आणि दाट लोकवस्तीचा हा भाग नेहमीच वाहतूक कोंडीमुळे डोकेदुखी ठरत आहे. एलबीएस मार्ग असो, वा स्टेशन परिसर सर्व ठिकाणी फेरीवाल्यांनी रस्ते अडवून आपली दहशत कायम ठेवली आहे. दुकानदारांनीही आता फुटपाथवर अतिक्रमण केले आहे.
नागरिकांच्या मते पालिकेचेच काही अधिकारी कारवाई करण्याअगोदर फेरीवाल्यांच्या नेत्याला त्याची सूचना देतात.
दुसर्या वॉर्डमधून कारवाई होणार असेल तर त्याची माहितीही फेरीवाल्यांना आगाऊ मिळते. त्यामुळे ही सर्व कारवाई धूळफेक ठरत आहे. भांडुप स्टेशन परिसरात पोलीस चौकी असतानाही त्यांच्यादेखत रिक्षाचालक तीनपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जात असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.
नागरिकांना चालण्यासाठी पदपथच शिल्लक नसल्याने त्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. मात्र बेदरकारपणे रिक्षाचालक सुसाट रिक्षा हाकत असल्याने चालायचे तरी कोठून असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
फुटपाथ आणि रस्ता अडविणारे फेरीवाले आणि दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र या आदेशाची अंमलबजावणी भांडुपमध्ये अजिबात झालेली नाही.
एलबीएस मार्गावर वाहतूक कोंडीतून बसने प्रवास करताना नाकीनऊ येतात. बस डेपो, रिक्षांची वर्दळ आणि फेरीवाले, दुकानदार यांच्यामुळे भांडुप स्टेशन रोडला पायी चालणे अवघड होऊन जाते. रिक्षावाल्यांची दादागिरी सुरू आहे. पालिकेचे अधिकारी फेरीवाल्यांना भेटून जातात. मात्र कारवाई केली जात नाही.
काशिनाथ बारामते, त्रस्त नागरिक
स्टेशन रोडवर फेरीवाल्यांनी फुटपाथ अडवून ठेवल्याने पायी चालणार्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत महानगरपालिकेचे अधिकारी काहीही कारवाई करीत नाहीत. स्टेशन रोडला येताना बसलाही कारण नसताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रिक्षाचालक प्रवाशांना वाटेल तशी वागणूक देतात.
मनोज मेढे, स्थानिक नागरिक