

पुढारी ऑनलाईन डेस्क : भांडूपमध्ये खुल्या गटारात बुडून एक दीड वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. कृष्णा ओमप्रकाश गुप्ता असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. १०) सायंकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी चिमुरडा खेळत असताना तो गटारात पडला. आणि पाण्यात बुडाला. एक दीड तासाने जेव्हा कुटुंबाने शोधाशोध केली. तेव्हा गटारात या मुलाचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
भांडुपच्या गावदेवी परिसरात मोरया हॉल समोर असलेल्या रस्त्याला लागून गुप्ता कुटुंबाचे घर आहे. या घरासमोर एक चार ते पाच फूट खोल असे गटार आहे. हे गटार काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी खुलेच आहे. त्यात मोठया प्रमाणात पाणी भरले आहे. रविवारी संध्याकाळी या ठिकाणी कृष्णा खेळत होता. खेळत असताना तो या गटारात पडला आणि बुडाला. एक दीड तासाने जेव्हा कुटुंबाने शोधाशोध केली. तेव्हा गटारात या मुलाचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला बाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेला पालिका जबाबदार असून या अगोदर वारंवार तक्रार करून ही गटार साफ केलेले नाही. गटार खुले ठेवले असल्याने पालिका याला जबाबदार असल्याचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.
तर या प्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे. भांडुप मधून निवडणूक लढवित असलेले मनसेचे नेते शिरीष सावंत आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पालिका एस विभागात जाऊन अधिकाऱ्यांना खडसावले.तसेच या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.