BEST Workers Strike Mumbai: जीवनवाहिनी कोलमडली, मुंबईकरांची उन्‍हात पायपीट

संतापलेल्या संघटनांनी १९ जूनपासून संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. त्‍यामुळे प्रशासनाने मेस्‍मा लागू केला होता.
BEST Workers Strike Mumbai
BEST Workers Strike MumbaiPudhari
Published on
Updated on

मुंबई: बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने कामगारांच्या ९ प्रमुख मागण्या प्रशासनाकडे केल्या होत्‍या. या मागण्यांसाठी संयुक्त बैठका घेऊनही उत्तर बेस्ट प्रशासनाने दिले नव्हते. त्यामुळे संतापलेल्या संघटनांनी १९ जूनपासून संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. त्‍यामुळे प्रशासनाने मेस्‍मा लागू केला होता.

मात्र त्‍याला न जुमानता संयुक्त कृती समितीने गुरुवारी मध्‍यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला. वडाळा, कुर्ला, धारावी, मागाठाणे, कुलाबा, गोरेगाव, ओशिवरा, मरोळ अशा मोठ्या आगारांच्या प्रवेशद्वारांवर संयुक्त कृती समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी 'काम बंद आंदोलन' केले. त्याचा परिणाम शुक्रवारी बेस्ट बसच्या सार्वजनिक वाहतुकीवर दिसून आला.

BEST Workers Strike Mumbai
BMC Vehicle Contract Controversy: वाहन भाडे कंत्राटात मोठ्या आर्थिक फेरफारचा संशय

बेस्टच्या २,७६६ बसे मुंबईकरांना सेवा देतात. सुमारे ३० लाख मुंबईकर या सेवेचा लाभ घेत असतात. मात्र शुक्रवारी बेस्टच्या फक्त ९ आणि कंत्राटी ३९ बसेस रस्त्यावर धावत होत्या. मात्र आंदोलक कर्मचार्‍यांनी १० ठिकाणी बसवर दगडफेक केली. तीन ठिकाणी बेस्ट बसच्या टायरची हवा सोडून देण्‍यात आली तर ३ ठिकाणी बसचे आरसे फोडण्यात आले.

त्‍यामुळे नाईलाजास्‍तव त्‍यांनाही आपली सेवा थांबवावी लागली. वांद्रे, सांताक्रूझ, दादर, माटुंगा अशा छोट्या मोठ्या आगारातील बेस्ट कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. अनेक आगारात शुकशुकाट होता. बीकेसी, चर्चगेट, सीएसएमटी, बॅकबे, दादर प्लाझा, जुहू अशा नेहमी गजबजलेल्या बस स्थानकांवर उन्‍हातान्‍हात प्रवासी बसची वाट पाहून वैतागले होते. रस्त्यावर बेस्ट बस नसल्याने मुंबईकरांची जीवनवाहिनी कोलमडली होती.

अनेकांनी लोकल ट्रेन आणि भुयारी मेट्रोकडे धाव घेतली. विद्यार्थी, वृद्ध नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक घेतली. मात्र अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. त्‍यामुळे शनिवारीही संप कायम राहिल्‍यास मुंबईकरांची गैरसोय होणार आहे.

बेस्ट कामगारांनी शुक्रवारी पुकारलेल्या संपात भाजपा नेते, आमदार प्रसाद लाड अध्यक्ष असलेली श्रमिक उत्कर्ष सभा आणि युनियन नेते शशांक राव यांची बेस्ट वर्कर्स युनियनचे कामगार सहभागी झाले नव्हते. मात्र प्रत्यक्षात मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे दिसून येत होते.

याबाबत माध्यमांनी विचारणा केली असता भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड म्हणाले की, हा संप पूर्णपणे अनधिकृत आहे. बेस्टमध्ये श्रमिक उत्कर्ष समिती आणि बेस्ट कामगार संघटना मध्ये यात ९० टक्के बीएसटीचे ओरिजनल कर्मचारी आहेत. काँग्रेस, उबाठा आणि कॅम्युनिस्ट पक्षाचा संघटनांकडून मुद्दाम संप केला जात आहे. यात कॉन्ट्रॅक्टरच्या बसेस आहेत त्यांचा संप केला गेलाय. यामुळे सामान्य लोकांना धारेवर धरण्याचा काम सुरु असल्याचे ते म्हणाले.

दररोजच्या मजुरीवर उदरनिर्वाह करणारे मजूर, गवंडी, बिगारी आणि सुतार यांना या संपाचा सर्वाधिक फटका बसला. मालवणी परिसरातून अंधेरी, मरोळ, मुलुंड, जुहू, दहिसर, घाटकोपर आदी भागांत कामासाठी जाणारे अनेक कामगार बेस्ट बस सेवेवर अवलंबून आहेत. मात्र, बस सेवा ठप्प झाल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही.

BEST Workers Strike Mumbai
NDA Studio Workers Issue: एनडीए स्टुडिओतील कामगारांवर उपासमारीची वेळ; वयाचे कारण देत अचानक कामावरून काढून टाकले

मुलुंडमध्ये बसची तोडफोड, दोन कर्मचाऱ्यांना अटक

बेस्ट संप सुरू असताना मुलुंड येथे बेस्टच्याच तीन कर्मचाऱ्यांनी बसची तोडफोड केली. हा हल्ला करणाऱ्या दोघांना मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या संपाचा मोठा त्रास सहन करावा लागला होता.अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी शांततेत हा संप पुकारला. मात्र मुलुंड येथे बेस्टच्या तीन कर्मचाऱ्यांनी एका बसला अडवून या बसवर हल्ला केला.

संपामुळे सार्वजनिक वाहतूक दिनाला अपयश

एमएमआरडीच्या पुढाकाराने बीकेसीत सुरू झालेल्या सार्वजनिक वाहतूक दिनाला बेस्टच्या संपामुळे दुसऱ्याच दिवशी अपयश आले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच बंद असल्याने प्रवाशांना स्वत:च्या खासगी गाड्याच रस्त्यावर उतरवल्या होत्या. सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन वेळांमध्ये बीकेसीच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होती. यामुळे बीकेसीतील प्रवास तर वेळकाढू होतोच प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होते.

दादरमध्ये प्रवाशांचे हाल

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका दादर परिसरातील प्रवाशांना बसला. संपामुळे हजारो प्रवाशांना रेल्वे, टॅक्सी आणि खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक बस डेपोमधून बाहेर पडू शकल्या नसल्याने दादर टीटी, प्लाझा, हिंदमाता आणि शिवाजी पार्क परिसरातील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.

संप मागे घेण्यासाठी परिवहन मंत्र्यांचे आवाहन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांवर चर्चा झाली.

या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव आसिम कुमार गुप्ता, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, कृती समितीचे प्रतिनिधी सचिन अहिरे, गजानन नांगे, नितीन नांदगावकर आदी उपस्थित होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. येत्या अधिवेशनात या संदर्भात बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

तत्पूर्वी स्थानिक प्रश्नासंदर्भात महाव्यवस्थापक स्तरावर ज्या मागण्या पूर्ण करणे शक्य आहे, आठवड्याभरात मागण्‍या पूर्ण कराव्यात असे निर्देश संबंधितांना दिले आहेत. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. दररोज सुमारे ३० लाख प्रवासी बेस्टवर अवलंबून आहेत. ४८ हजारांहून अधिक कामगार संस्थेशी जोडलेे आहेत. त्यामुळे संपामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे मोठे हाल होऊ शकतात. चर्चा सकारात्मक वातावरणात सुरू असून, कर्मचाऱ्यांनी जनहिताचा विचार करून संप मागे घ्यावा, असे भावनिक आवाहनही सरनाईक यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news