

मुंबई: ग्रॅच्युइटी किंवा इतर कामांसाठी आगारात आल्यावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुरक्षा रक्षकांकडून सन्मानाची वागणूक दिली जात नाही. पुरावा नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारला जातो.
या अडचणी दूर करण्यासाठी आता बेस्ट कर्मचाऱ्यांना ओळखपत्र असलेले बेस्ट पास दिले जाणार असल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी येथे दिली. बेस्ट दिनाचे औचित्य साधून हे बेस्ट पास दिले जाणार आहेत. साडेतीन हजार निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. १६ एप्रिल २०२५ आणि प्रशासक काळातील ठराव क्र. ६७ नुसार २३ एप्रिल २०२५ अन्वये मंजूर केलेल्या, इतर सेवानिवृत्त कर्मचारी सदस्य यांना वार्षिक रु. ९००/- मूल्यवर्गाचा हा बसपास उपलब्ध करण्यात आलेला आहे. या बसपासच्या मूल्यामध्ये कोणताही बदल प्रस्तावित करण्यात आलेला नाही.
बसपासची कार्यपद्धती
गेल्या १ जून २०२४ पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अंतिम देयके व उपदानाचे १०० टक्के प्रदान करण्यात आलेले नाही, अशा कर्मचा-यांना महापालिकेच्या मंजुरीच्या दिनांकापासून प्रतिवर्षी रुपये ९९ इतक्या शुल्काचा बसपास मिळविता येणार आहे.
पात्र असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी 'चलो ॲप' च्या माध्यमातून बेस्ट उपक्रमामध्ये नोंदणी असलेल्या भ्रमणध्वनीद्वारे स्वतःचा बसपास कार्यान्वित करता येईल. ज्यांनी हा बसपास कार्यान्वित केला असेल, त्यांच्या अंतिम देयकामधून बसपासचे मूल्य वजा करण्यात येणार आहे.
या सवलतीच्या बसपासचा गैरवापर आढळून आल्यास संबंधित कर्मचा-यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना बेस्ट प्रशासनाने दिल्या आहेत.