

मुंबई: तीन दिवसांपासून बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने पुकारलेला बेमुदत संप अखेर रविवारी मागे घेण्यात आला. तरीही सोमवारी सकाळी जवळपास निम्म्याच बेस्ट बसेस कार्यरत होत्या. त्यामुळे बेस्ट बसने प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांना बेस्ट थांब्यासमोर लागलेल्या रांगांमध्ये तात्कळत उभे राहण्याची वेळ आली.
गेल्या शुक्रवारपासून १९,२४५ चालक व १५,२७५ वाहकांनी काम बंद आंदोलन करत बेस्ट संपात सहभाग घेतला. यामुळे २,७८८ पैकी फक्त ५२ बसेस रस्त्यावर धावल्या होत्या. त्यामुळे बेस्टच्या २५ लाख प्रवाशांचे तीन दिवस हाल झाले.
रविवारी तोडगा निघाल्यानंतर बेस्ट संयुक्त कृती समितीने संप मागे घेतल्याची घोषणा केली. बेस्टच्या स्वतःच्या २४९ गाड्या व कंत्राटी २५१७ अशा एकूण २७६६ बसेस गाड्या आहेत.
बेस्टचे स्वतःचे २०९१ चालक आहेत. त्यापैकी सोमवारी फक्त १३२३ चालक कामावर होते. शिवाय ३१४१ कंडक्टरपैकी फक्त २०७१ कंडक्टर कार्यरत होते. दुसरीकडे कंत्राटी ३०२९ चालक असताना फक्त १२७९ चालक कामावर होते.
९५५ कंत्राटी कंडक्टर पैकी फक्त ३१२ कंडक्टर कामावर होते. जवळपास निम्म्याहून अधिक चालक व कंडक्टर सोमवारी कामावर नसल्याने त्याचा मोठा परिणाम बेस्ट सेवेवर दिसून आला.
दुपारी तीन वाजताही बेस्टच्या ४०८४ चालकांपैकी १६३७ चालक आणि ८१३० कंडक्टरपैकी ५७९१ कंडक्टर तसेच कंत्राटी ४१८३ चालकांपैकी १८४० चालक आणि १३६६ कंडक्टरपैकी फक्त ४७० कंडक्टर कामावर होते.
संप मिटल्यामुळे नियमित बसेस रस्त्यावर असतील असा विचार करून पहाटेपासून मुंबईकर नागरिकांनी बेस्ट स्थानक आणि आगारात मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र बस वेळेवर येत नसल्याने रांगेमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांचे सोमवारीही मोठे हाल झाले.