

राजेश सावंत
मुंबई: पावसाळ्यामुळे मुंबईतील सिमेंट काँक्रिटी करणासाठी खोदलेले व अर्धवट राहिलेले रस्ते पुन्हा पूर्ववत बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून मुंबई शहर व उपनगरात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून पावसाळ्याचे चार महिने का होईना, सुटका झाली आहे.
मुंबई शहर व उपनगरात ४७८ किलोमीटरपेक्षा लांबीच्या सुमारे १,२२८ पेक्षा जास्त रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करत असताना अनेक ठिकाणी एक दिशा मार्ग ठेवण्यात येतो. तर काही ठिकाणी रस्त्याच्या रुंदीनुसार दोन्ही दिशांनी वाहतूक सुरू ठेवण्यात येते. यामुळे संपूर्ण शहरातच वाहतूक कोंडी होते.
त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासही लांबला आहे. परंतु पावसाळ्यात खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन महानगरपालिकेने १ एप्रिलपासूनच रस्ते खोदण्यास बंदी घातली होती. एवढेच नाही तर ३१ मे पूर्वी खोदलेले रस्ते बुजवण्याची ताकीदही देण्यात आली होती. परंतु काही ठिकाणी ३१ मे पूर्वी रस्ते बुजवणे शक्य न झाल्यामुळे गेल्या आठवड्याभरात सिमेंट कॉंक्रिटीकरण सुरू असलेले सर्व रस्ते बुजवण्यात आल्याचा दावा रस्ते विभागाने केला आहे.
अर्धवट असलेली रस्त्याची कामे थांबून खोदलेल्या रस्त्याच्या ठिकाणी पुन्हा डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता वाहतुकीसाठी पूर्ण रस्ता खुला झाला असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. सुमारे १०० किमी लांबीचे रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी खुले झाल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे. दक्षिण मुंबईच्या दादर पश्चिम व पूर्व उपनगरांत होणारी वाहतूक कोंडीही कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
८ महिन्यापासून मुंबईकर होते त्रस्त
मुंबई शहर व उपनगरात १ ऑक्टोबर २०२५ पासून रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून मुंबईकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त होते. परंतु पावसाळ्याचे चार महिने का होईना, म्हणजेच १ ऑक्टोबरपर्यंत मुंबईकरांचा प्रवास सुखकर व जलद होणार आहे.
१५ ते २० मिनिटाची होणार बचत
वाहतूक कोंडीतून सुटका झाल्यामुळे वाहन चालकांची १५ ते २० मिनिटांची बचत होणार आहे. ज्या रस्त्यावरून जाण्यासाठी जेमतेम दहा मिनिटांचा वेळ लागतो. अशा रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे २५ ते ३० मिनिट लागतात. त्यात एखादी गाडी बंद पडली तर मग वेळेचे बंधनच राहतच नाही.