

मुंबई : बेस्टचे सुमारे एक हजार कोटीचे अनुदान रोखत हिशेब सादर करण्याची मागणी स्थायी समितीने केली होती. त्यानुसार गुरुवारी बेस्ट मव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी समितीत प्रत्यक्ष उपस्थित राहत बेस्टचा आर्थिक ताळेबंद मांडला. बेस्टला अजून सेवानिवृत्त कामगारांची देणी देण्यासह बस वाहतुकीमधील येणारी तुट भरून काढण्यासाठी ३,९४१ कोटींची मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेतर्फे उपक्रमाला अनुदान देण्यात येते. यावेळीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. परंतु अनुदानाचा कशाप्रकारे वापर कसा करतात याची माहिती स्वतः महाव्यवस्थापकांनी स्थायी समितीला द्यावी, अशी आग्रही मागणी समिती सदस्यांनी केली होती.
यानुसार त्यांनी बेस्टचा ताळेबंद मांडला. २०२५-२६ या आर्थिक वर्षात उपक्रमाचा विद्युत विभाग ११५ कोटी रुपयांच्या फायद्यात होता. परंतु परिवहन विभाग ३,५५७ कोटी रुपयांच्या तुटीत आहे. त्यामुळे तिजोरीमध्ये आर्थिक खडखडाट आहे. बस प्रवर्तनासाठी येणारी तुट भरून काढण्यासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात २,४३९ कोटी रुपये तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युईटी व अन्य देणी देण्यासाठी १,५०२ कोटी रुपये अशा ३,९४१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेकडून हे अनुदान मिळावे, कशी मागणी यावेळी महाव्यवस्थापक यांनी केली.
बेस्ट उपक्रमाचे उत्पन्न वाढीसाठी २०१९ पासून स्वमालकीचा बस ताफा कमी करून भाडेतत्वावरील बस ताफ्यात वाढ करून ती २,५५५ इतकी आहे. भाडे सुधारणा करून नॉन एसीचे किमान भाडे ५ रुपयावरून १० रुपये तर एसीचे किमान भाडे ६ रुपयांवरून १२ रुपये करण्यात आले. २०१६ नंतर बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या भरतीप्रक्रिया स्थगित केली. त्यामुळे बेस्टमध्ये १८,५७१ रिक्त पदे आहेत.
बस व बस थांब्यांवरील जाहिराती, दुकाने भाड्याने देणे, सार्वजनिक ईव्ही चार्जिंग, होर्डिंग्ज आणि बिलबोर्ड्स यांच्या माध्यमातून ३७२ कोटी रुपयावरुन ३९८ कोटी एवढी वाढ झाली आहे. पालिकेने सुचविलेल्या उपयोजनेनुसार स्ट्रीट लायटिंग खांब्यावरील जाहिरातीमधून उत्पन्न वाढविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वीज गळती व वीज चोरी कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी जुनी यंत्रणा व जुन्या केबल्स बदलण्यात येत आहेत. तसेच यासाठी जुने मीटर बदलून ५.९ लाख स्मार्ट मीटर देखील लावण्यात आले असल्याचे महाव्यवस्थापक यांनी सांगितले.
७१९६ बसची कमतरता
मुंबईकरांचा जलद प्रवास होण्यासाठी वेळेत बस उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. परंतु सध्या बेस्ट तब्येत २,८०४ बस असून सुमारे ७,१९६ बसची कमतरता आहे.